एक मुलगा इंग्रजी विषय घेऊन एम्.ए. परीक्षेत पहिल्या वर्गात आला. त्याच्या मामाने त्यास श्रीमहाराजांना भेटण्यास सांगितले. तो म्हणाला, ‘मामा, मी देव, ईश्वर, महाराज इत्यादी काही मानत नाही. मी पूर्ण नास्तिक आहे. तेेव्हा तुम्ही मला या भानगडीत पाडू नका.’ नंतर तो मुलगा सिद्ध होऊन ते श्रीमहाराजांच्या दर्शनास गेले. त्या वेळी श्रीमहाराजांनी त्याचे अभिनंदन करत ‘ज्याच्या कृपेने एवढे यश आपल्याला मिळाले, त्या भगवंताला आपण विसरू नये’, असा त्यास उपदेश केला. तेव्हा तो मुलगा श्रीमहाराजांना म्हणाला, ‘माझा परमेश्वरावर अजिबात विश्वास नाही. मी राम इत्यादी जाणत नाही. मी पूर्ण नास्तिक आहे.’ त्यावर श्रीमहाराज न रागावता त्याला म्हणाले, ‘तुमच्यासारखी नास्तिक माणसेच मला मनापासून आवडतात. सत्पुरुषच खरे नास्तिक असतात. भगवंत नाही म्हणून तुम्ही स्वतःस नास्तिक म्हणवता, भगवंताहून इतर काही जगात नाही; म्हणून संतपुरुष स्वतःस नास्तिक म्हणवतात, एवढाच दोघांमध्ये भेद आहे.’ हे ऐकून तो मुलगा गोंधळून गेला. तो म्हणाला, ‘आपण असे कसे म्हणता ? माझा राग कसा आला नाही ? हे कसे ?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘इथे बसलेली मंडळी स्वतःला आस्तिक समजतात; परंतु जेव्हा काही प्रसंग येतो, तेव्हा ती अगदी नास्तिकासारखी वागतात. त्यापेक्षा तुम्ही स्वतःशी पूर्ण प्रामाणिक आहात.’ तो मुलगा पुढे पटकन बोलून गेला की, मुंबईच्या महाविद्यालयात प्राध्यापक पदाची जागा रिकामी आहे. तिच्यासाठी मी अर्ज केला आहे. ती मला मिळावी, असा आशीर्वाद आपण मला द्यावा.’ तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘आपण स्वतःला नास्तिक म्हणवतो, तर त्याने जेथे ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’, अशी धमक दाखवली पाहिजे. तेव्हा ‘रामाच्या कृपेने मला ही जागा मिळू दे’, असे म्हणाला, तरच मी आशीर्वाद देईन.’ शेवटी तो तसे म्हणाला आणि श्रीमहाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. मुलाच्या मामास श्रीमहाराज म्हणाले, ‘शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च करून शिकून बाहेर पडलेली मुले नास्तिक बनतात. उत्तम वृत्तीची मुले सिद्ध होतील, असा पालट अभ्यासक्रमात करणे अत्यावश्यक आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’)