अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

उदकुंभदान (उदककुंभदान) करणे

१. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान

या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.

२. महत्त्व

उदककुंभालाच सर्वसमावेशक स्तरावरील ‘निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

३. उद्देश

अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे

आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.

इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावानेही लिखाण करतात.) (१०.४.२००९)

देवता आणि पूर्वज यांना तिलतर्पण करणे

तिलतर्पण करणे

१. अर्थ आणि भावार्थ

अ. तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.

आ. देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार ? तसेच मी देवाला काहीतरी अर्पण करतो’, हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण करतांना ‘देवच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे तिलतर्पण करतांना साधकाचा अहं न वाढता त्याचा भाव वाढण्यास साहाय्य होते. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला तिळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय.

२. तिलतर्पण कोणाला करायचे ?

२ अ. देवता

२ अ १. पद्धत : प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.

२ अ २. परिणाम : प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर) तीळ अर्पण केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता अधिक प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्‍याचा भाव जागृत होतो. भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता तिलतर्पण करणार्‍याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते.

अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व

अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते; परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते, तर त्यांना ईश्वरप्राप्ती करायची असते. यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्च्या कार्यात दान करणे. सत्पात्रे दान केल्यामुळे दान करणार्‍याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधक स्वर्गलोकात न जाता उच्च लोकांत जाईल.

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.