पत्नीकडून होणार्‍या विविध प्रकारच्या तीव्र त्रासांमध्ये अतिशय शांतपणे आणि संयम राखून सकारात्मकरित्या परिस्थिती हाताळणारे पती !

‘पत्नी रात्रं-दिवस छळत असतांना इतका चांगला पती असू शकतो, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. तो कसा असतो, हे या लेखावरून लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘आमच्या एका नातेवाइकांच्या विवाहाला २४ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पत्नीला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. अनेकदा पत्नी जसे म्हणेल, तसेच पतीला वागावे लागायचे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास पत्नीमधील अनिष्ट शक्तीचा त्रास वाढून ती प्रतिदिन पतीशी भांडायची किंवा त्यांना ओरडायची. ‘मी म्हणेन तीच पूर्वदिशा’ असा भाग अधिक प्रमाणात असल्याने पतीला नेहमीच पत्नीचे ऐकावे लागायचे. विवाह झाल्यापासून पत्नी देत असलेल्या त्रासाला पतीने विनातक्रार तोंड दिले आहे.

वर्ष २०१४ पासून आतापर्यंत काही कामानिमित्त मधे मधे त्यांच्या घरी रहायला गेल्यावर समोर घडलेले प्रसंग पाहून त्यांच्या पत्नीच्या त्रासाची तीव्रता जवळून अनुभवता आली. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच ‘हा आध्यात्मिक त्रास आहे’, हे लक्षात आले. त्यांना आध्यात्मिक त्रासाविषयी ठाऊक नाही. पत्नी जसे म्हणेल, तसे शांतपणे करणे, प्रत्युत्तर न देणे, पुरुषी अहंकार व्यक्त न करणे, पत्नीला अनुकूल अशाच गोष्टी करणे अशा प्रकारे ते पती प्रत्येक प्रसंगात कृती करत होते. पत्नीच्या तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे पतीला भोगावा लागणारा त्रास, प्रतिदिनची असणारी प्रतिकूल स्थिती आणि त्यांचे जीवन याविषयीची सूत्रे पुढील लेखात दिली आहेत.

१. सकाळचा दिनक्रम

१ अ. पत्नीने सांगितलेल्या वेळेतच पतीला उठावे लागणे : ‘पत्नीने सांगितलेल्या वेळेतच पतीला उठावे लागायचे. ‘वेळेत उठला नाहीत, तर एकतर चहा मिळणार नाही किंवा थंड चहा मिळेल. गॅसवर पुन्हा चहा गरम करायचा नाही; कारण गॅस वाया जातो’, असे पत्नी सांगायची. त्यामुळे ते तिने सांगितलेल्या वेळेतच उठायचे.

१ आ. पत्नीने घरी येण्याविषयीच्या वेळेचा कडक नियम घालून देणे आणि त्याच वेळेत पतीला घरी यावे लागणे : त्या दांपत्याची २ घरे होती. दोन्ही घरांमध्ये केवळ ५ मिनिटांचे अंतर होते. पती रात्री झोपायला त्यांच्या दुसर्‍या घरी जायचे आणि सकाळी तेथून उठून पत्नी रहात असलेल्या घरी चहा प्यायला यायचे. ‘तुम्ही प्रतिदिन पावणे सातपर्यंतच चहा प्यायला यायला पाहिजे’, असा कडक नियमच पत्नीने घालून दिला होता.

१ इ. सकाळी घरी येण्यास पतीला ५ मिनिटे विलंब झाल्यावर पत्नीने सांगितल्याप्रमाणे त्यांना थंड चहा प्यावा लागणे : एकदा त्यांना यायला केवळ ५ मिनिटे विलंब झाला. तेव्हा मी त्यांच्या पत्नीला म्हणाले, ‘‘सकाळची वेळ आहे. त्यांना कुणीतरी फिरायला जाणारे भेटले असतील. ते बोलायला थांबले असतील. त्यामुळे त्यांना कदाचित् विलंब झाला असेल.’’ त्यावर ती रागातच म्हणाली, ‘‘त्यांना कळायला नको का, किती वेळ कुणाशी बोलायचे ? इकडे सगळे आटपायला विलंब होतो.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मी त्यांना चहा गरम करून देते.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘तुम्ही काय प्रतिदिन येणार आहात का माझ्याकडे ? उगाच नसत्या सवयी लावू नका. गार चहा प्यायल्याने काही होत नाही. उद्या ते लवकर येतील.’’ पती घरात आल्यानंतर थंड झालेला चहा शांतपणे प्यायले आणि त्यांनी पुढील कामांना प्रारंभ केला.

१ ई. ‘चहा पिण्यापूर्वी आदल्या दिवशीचा कचरा कचराकुंडीत टाकून यायचा’, असेही पत्नीने त्यांना सांगितले होते. त्यामुळे घरात आल्यावर प्रथम ते कचरा टाकायचे आणि मगच चहा प्यायचे.

१ उ. सकाळचा अल्पाहार घेऊन झाल्यावर पत्नीने पतीला लगेचच घरातून निघण्यास सांगणे आणि त्यांनी त्याप्रमाणे करणे : काही वेळेला ते आमच्यासाठी बाहेरून अल्पाहार घेऊन यायचे. खाऊन झाल्यावर ती पतीला सांगायची, ‘‘आता तुम्ही निघा; कारण घरकाम करणारी बाई (गृहकृत्य साहाय्यक) येणार आहे.’’ तिने म्हटल्यावर तेही लगेचच निघायचे. ते निघतांना ती त्यांना सांगायची, ‘‘संध्याकाळी ७ वाजता आलात, तरच जेवण मिळेल.’’

२. पत्नीने प्रतिदिन सासूबाईंविषयीच्या तक्रारी करणे आणि स्वतःच्या आईविषयी ऐकूनही पतीने परिस्थिती शांतपणे स्वीकारणे

दिवसभरात अनेक प्रसंगांत पत्नीकडून सासूबाईंचे निधन झाल्यानंतरही त्यांच्याविषयी बोलणे (सासूबाईंविषयीच्या तक्रारी करणे) चालू असायचे. ती पतीला म्हणायची, ‘‘तुमच्या आईमुळे माझी अशी नाजूक स्थिती झाली आहे.’’ स्वतःच्या आईविषयी असे ऐकूनही ते त्याही परिस्थितीत शांतपणे राहून सर्व स्वीकारायचे.

३. रात्री जेवणाच्या वेळेत पत्नी म्हणेल तोच दिवा लावायचा. तिला कमी प्रकाशाच्या दिव्यात जेवायचे असेल, तर पतीलाही कमी प्रकाशाच्या दिव्यातच जेवायला लागायचे. मोठा प्रकाशाचा दिवा लावता यायचा नाही.

४. पत्नीसाठी बाहेरून विविध पदार्थ आणणे आणि तिने न सांगितलेला पदार्थ आणल्यास पुष्कळ ओरडा खावा लागूनही पतीने शांतपणे जेवणे

तिच्या पतीला खाण्याची पुष्कळ आवड आहे; मात्र पत्नीची शारीरिक स्थिती नसल्याने तिला वेगळे पदार्थ सिद्ध करता यायचे नाहीत. असे असतांनाही ती जेवणाच्या वेळी खाऊ शकेल, असे पदार्थ ते तिच्यासाठी आणायचे. एखाद्या वेळेस तिने सांगितलेल्या व्यतिरिक्त त्यांनी काही वेगळा पदार्थ आणला, तर ती त्यांना पुष्कळ ओरडायची. तिच्या बोलण्यावर प्रत्युत्तर न देता ते शांतपणे जेवायचे आणि लगेचच त्यांच्या दुसर्‍या घरी निघून जायचे.

५. पायाच्या जखमेवर औषध लावतांना खाली पडलेले रक्ताचे थेंब पतीलाच पुसण्यास सांगणे

एकदा काही कारणामुळे त्यांच्या पायाला जखम झाली होती. पायाला मलमपट्टी बांधून औषध लावतांना पायातून आलेले रक्ताचे काही थेंब भूमीवर सांडले. त्या वेळी ती त्यांना म्हणाली, ‘‘ते थेंब आधी पुसा आणि मगच बाहेर जा.’’

६. सनातनविषयी कोणताही विषय न सांगण्याची आणि न ऐकण्याची ताकीद दिलेली असणे

पती आणि पत्नी यांचे संभाषण चालू असतांना ‘तुम्ही मधेच काहीही बोलायचे नाही’, असे मला तिने सांगितले होते. त्यामुळे मी काहीही बोलू शकत नव्हते. ‘पतीच्या समोर तुम्ही सनातनच्या संदर्भात कोणताही विषय काढायचा नाही’, असेही बजावले होते आणि तिने पतीलाही सांगितले होते, ‘‘यांनी तुम्हाला सनातनविषयी काहीही सांगितले, तरी तुम्ही ते ऐकायचे नाही. त्याकडे लक्ष द्यायचे नाही.’’

७. पत्नीने सांगितल्यानुसारच पतीने अन्य नातेवाइकांसाठी खाऊ आणणे, त्यात मनाने पालट केल्यास पतीला ओरडणे आणि तेव्हापासून त्यांनी खाऊ आणणे बंद करणे

काही वर्षांनी ते नातेवाईक आमच्या घराजवळ रहायला आले. तेव्हा तिचे यजमान ५-६ दिवस तेथे रहायचे आणि अन्य वेळी त्यांच्या गावाला रहायचे. गावाहून येतांना ‘माझ्या मुलांसाठी काहीतरी खायला आणूया’, असे त्यांना वाटायचे. तेव्हाही पत्नी जे खाऊचे पदार्थ सांगेल, तेच पदार्थ ते आणायचे. त्यांनी मनाने दुसरे कोणते पदार्थ आणले, तर ती त्यांना पुष्कळ ओरडायची. नंतर मी त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही काहीही आणू नका. तुमच्या पत्नीचे बोलणे नकोसे वाटते आणि तुम्हालाच त्याचा त्रास होतो.’’ त्यानंतर त्यांनी पदार्थ आणणेच बंद केले.

८. आर्थिक कामांसाठी आवश्यकता असल्याने पत्नीने गोड बोलणे

तिच्या अधिकोषात (बँकेत) असणार्‍या वैयक्तिक पैशांचा आयकर परतावा (रिटर्न) भरणे आदी कामे तिचे पती करतात. या कामांसाठी म्हणून पत्नी त्यांच्याशी पुष्कळ गोड बोलायची. तेव्हा ते मला सांगायचे, ‘‘आता अधिकोषाची कामे करायची आहेत ना ? म्हणून ती गोड बोलते. कामे झाली की संपले.’’ त्या कामात काही चूक झाल्यास ती त्यांना पुष्कळ बोलायची.

९. पत्नी म्हणेल त्याच वेळेत पतीने जेवायला येणे आणि कुणाशीही न बोलता तिच्यासमवेतच घरी जाणे

ते दाेघेही प्रतिदिन आमच्या घरी जेवायला यायचे. तेव्हाही पत्नी म्हणेल, त्याच वेळेत जेवायला यायचे आणि ‘पत्नी म्हणेल त्याच वेळेत पुन्हा घरी जायचे’, असे ठरलेले होते. नेहमीची ये-जा झाल्याने १-२ जणांशी त्यांची ओळख झाली होती; पण पत्नीने सांगितल्यामुळे त्यांना अन्य कुणाशी अधिक वेळ बोलता यायचे नाही किंवा मोजकेच बोलावे लागायचे. जास्त काही बोलणे झाल्यास पुन्हा ती त्यांना ओरडायची. त्यामुळे जेवण झाल्यावर ते तिच्या समवेत लगेचच घरी जायचे.

१०. पत्नीला पतीने मधे मधे चहा पिणे आवडत नसणे आणि चहा हवा असल्याचे पतीला घरकाम (गृहकृत्य साहाय्यक) करणार्‍या महिलेला खुणेने सांगावे लागणे

एकदा पत्नीला चहा हवा होता. तेव्हा तिने घरकाम करणार्‍या बाईला तिच्यापुरता चहा करायला सांगितला. प्रत्यक्षात तिचे यजमान घरातच होते, तरीही तिने त्यांना ‘तुम्हाला चहा हवा का ?’, असे विचारले नाही. पतीने घरकाम करणार्‍या बाईला त्यांच्यासाठीही थोडा चहा ठेवण्यास खुणेने सांगितले. (पत्नीला त्यांनी मधे मधे चहा घेणे आवडत नसल्याने ते चहा हवा असल्याचे प्रत्यक्ष बोलू शकत नव्हते. पत्नीला हे समजले असते, तर ती त्यांच्यावर चिडली असती. त्यामुळे पतीने तसे केले. – संकलक)

११. पायाच्या शस्त्रकर्माच्या वेळी पत्नीच्या साहाय्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व कृती सकारात्मक राहून करणे

मार्च २०१९ मध्ये एकदा त्यांच्या पायाला जखम झाल्याने त्याचे शस्त्रकर्म करावे लागले. त्या वेळी त्यांनी त्यांची सर्व सोय मित्रांच्या साहाय्याने एकट्यानेच केली. पत्नीकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. पाय ठीक होण्यास त्यांना २ मास लागले. इतके सगळे होऊनही ते नेहमी सकारात्मक असायचे.

१२. देवावरील श्रद्धेमुळे पती सर्व प्रसंगांत स्थिर असणे

एकूणच सर्व प्रतिकूल स्थिती असूनही त्यांची देवावर श्रद्धा आहे. त्यामुळे ते नेहमी म्हणतात, ‘‘आजचा दिवस पार पडला की संपला. उद्या काय वेगळे असेल, ते ठाऊक नाही. जे असेल त्याला तोंड द्यायचे. तो (देव) बघेल.’’ देवावरील श्रद्धेमुळेच ते अनेक प्रसंगांत स्थिर असतात.

१३. मी त्यांना काही वेळा ‘तुम्ही कसे आहात ?’, असे विचारायचे. त्या वेळी ते म्हणायचे, ‘‘show must go on. चालू आहे !’’  (नाटक चालू राहिले पाहिजे. ते चालू आहे.)

अशा प्रकारे पत्नी देत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासांना ते एकदम स्थिर राहून सामोरे जात होते. पत्नीच्या त्रासाची समाजात किंवा कुटुंबियांकडे कसलीच वाच्यता केली नाही किंवा तिच्याविषयी कसली तक्रारही केली नाही. ‘इतकी वर्षे असा त्रास सहन करूनही ते कधी चिडले आहेत किंवा तिच्याशी भांडले आहेत’, असे मी कधीच पाहिले नाही. पत्नीचा असा त्रास भोगूनही निरपेक्ष वृत्तीने जगणारी माणसे समाजात आहेत, हे नातेवाइकांच्या उदाहरणातून मला शिकायला मिळाले.

परात्पर गुरु डॉक्टर, पत्नीच्या त्रासातही स्थिर रहाणार्‍या पतीमधील गुण दाखवून देऊन ते तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतले, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– एक साधिका

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.