बनासकांठा (गुजरात) येथे गावातील गोशाळेत कोविड सेंटर !

रुग्णांवर गोमूत्र आणि गायीचे दूध यांद्वारे उपचार !

केंद्र सरकारने देशातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती पहाता अशा प्रकारचे सेंटर सर्वत्र निर्माण करण्यासाठी गोशाळा चालक आणि आयुर्वेदाचे वैद्य यांना अनुमती दिली पाहिजे, असेच यावरून वाटते !

बनासकांठा (गुजरात) – येथील तेतोडा गावातील एका गोशाळेचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. येथील रुग्णांवर गायीचे दूध आणि गोमूत्र यांपासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या साहाय्याने उपचार केले जात आहेत. या कोविड सेंटरचे नाव ‘वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असे असून मोहन जाधव हे सेंटर चालवत आहेत. ५ मे या दिवशी हे कोविड सेंटर चालू करण्यात आले. येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यात आरोग्य सुविधांची वानवा जाणवत आहे. यावरून गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. तरीही राज्यातील परिस्थिती अद्यापही बिकट आहे.

१. महेश जाधव यांनी सांगितले की, या सेंटरमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला ८ प्रकारची औषधे दिली जातात. ही औषधे गायीचे दूध, तूप आणि गोमूत्र यांपासून बनवलेली आहेत. या रुग्णांना गो तीर्थ दिले जाते, जे गोमूत्र आणि इतर वनस्पती यांपासून बनवलेले आहे. त्याचसमवेत रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही औषधे दिली जातात, जी गायीच्या दूधापासून बनवलेली आहेत. या सेंटरमध्ये २ आयुर्वेदीय वैद्यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे वैद्य कोरोनाबाधितांवर उपचार करतात. रुग्णांना आवश्यकता भासल्यास अ‍ॅलोपॅथीची औषधेही दिली जातात. त्यासाठीही २ एम्.बी.बी.एस्. डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत.

२. बनासकांठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल म्हणाले की, कोविड केअर सेंटर चालवण्यासाठी कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही. गोशाळेत चालू असलेल्या कोविड सेंटरविषयी माहिती देण्यात आली होती आणि त्याला अनुमतीही देण्यात आली आहे.