कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

हिंदूंच्या मिरवणुकांना ‘पाप’ सांगत मुसलमानबहुल भागातून जाण्यास विरोध करणार्‍यांना मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

पेरंबलूर (तमिळनाडू) – केवळ एका भागात विशेष धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात; म्हणून दुसर्‍या धर्माचे सण साजरे करणे किंवा रस्त्यावरून मिरवणूक काढणे, हे रोखता येणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना दिला. अनेक वर्षांपासून येथील वी कलाथुर या मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या मंदिरांच्या मिरवणुकांना ‘पाप’ संबोधून त्याला धर्मांध कट्टरतावाद्यांकडून विरोध केला जात आहे. याविषयी मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ‘जर अशा धार्मिक असहिष्णुतेला अनुमती दिली, तर ते एका धर्मनिरपेक्ष देशासाठी चांगले ठरणार नाही. कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

१. न्यायालयाने म्हटले की, जर अशा प्रकारची सूत्रे स्वीकारली, तर कोणत्याही अल्पसंख्य समाजाला देशातील बहुतेक भागांमध्ये सण साजरे करता येणार नाहीत. यामुळे धार्मिक लढाई, दंगली होऊन त्यात लोकांचे प्राण जाऊन मोठी हानी होऊ शकते.

२. वर्ष २०१२ मध्ये या भागात स्थानिक मुसलमानांनी मंदिराच्या मिरवणुकीला ‘पाप’ सांगत विरोध केला होता. या संदर्भात हिंदूंनी पोलिसांकडे सुरक्षा देण्याची मागणी केली होती. त्यावर काही अटी घालून सुरक्षा पुरवण्यात आली होती. वर्ष २०१२ पूर्वी येथे विरोध करण्यात येत नव्हता.