बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवी देहली – जेव्हा ग्राहक नवीन भ्रमणभाष क्रमांक घेऊन जुना बंद करतो, तेव्हा सीमकार्ड आस्थापने जुना क्रमांक रिसायकल करून नव्या ग्राहकाला देऊन टाकतात. यामुळे जुन्या ग्राहकाला त्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. नवीन ग्राहकाला जुन्या ग्राहकाचा या क्रमांकाशी निगडित डेटा पहाता येऊ शकतो. याविषयी अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापिठाच्या संशोधकांनी सांगितले आहे की, दूरसंचार आस्थापनांकडून जुन्या क्रमांकांच्या पुनर्वापराची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षा आणि गोपनीयता यांवर प्रश्‍न निर्माण करते. नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.

१. जेव्हा ग्राहक स्वतःचा क्रमांक पालटतो, तेव्हा तो त्यांच्या डिजिटल खात्यात क्रमांक अपडेट करणे विसरून जातो, उदा. अनेकदा ‘ई कॉमर्स अ‍ॅप’मध्ये जुन्या क्रमांकाचा वापर केलेला असतो. एका पत्रकाराने जेव्हा नवीन क्रमांक घेतला, तेव्हा त्याच्याकडे रक्त चाचणी आणि स्पा यांसंदर्भातील काही संदेश येऊ लागले, असे या संशोधकांच्या अहवालात म्हटले आहे.

२. संशोधानच्या वेळी २०० रिसायकल क्रमांकांची एका आठवड्यापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ क्रमांकावर जुन्या ग्राहकासाठी संदेश आणि कॉल येत होते. या क्रमांकांवर अनेकदा ऑथेंटिकेशन असलेले संदेश आणि ओटीपीही आले.

३. यानंतर संशोधकांनी ८ संभावित धोके अधोरेखित केले. यातील महत्त्वाचा धोका म्हणजे ग्राहकावर हॅकर्सकडून आक्रमण होऊ शकते. हॅकर या क्रमांकांचा वापर करून निरनिराळे अलर्ट, वृत्त, मोहीम आदींसाठी उपयोग करू शकतात.