परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ललितात्रिपुरसुंदरीदेवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ९.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ललितात्रिपुरसुंदरीदेवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे ९.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ललितात्रिपुरसुंदरीदेवीसाठी लक्षकुंकुमार्चन केले. या विधीचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

१. बीजमंत्रोच्चारांसहित पूजेचे उपचार देवीला अर्पण करणे

साधक पुरोहितांनी विविध बीजमंत्रांचे उच्चारण करत देवीला विविध उपचार अर्पण केले. त्यामुळे पूजेतील उपचारांसह बीजमंत्रातील दैवी ऊर्जाही देवीच्या चरणी अर्पण झाली. त्यामुळे देवीची मूर्ती जागृत झाली.

बीजमंत्रांचा क्रम पूजेतील उपचारांच्या क्रमानुसार लावलेला आहे.

२. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन चालू केल्यावर ‘श्रीयंत्र श्रीललितात्रिपुरसुंदरीदेवीच्या महालाप्रमाणे दिसत आहे’, असे जाणवले.

३. कुंकुमार्चन केल्यावर श्रीयंत्रामध्ये ध्यानस्थ आणि तोंडवळ्यावर स्मितहास्य असणार्‍या देवीचे दर्शन झाले. ‘हे देवीचे तारक रूप असून ती साधकांवर प्रसन्न आहे’, असे जाणवले.

कु. मधुरा भोसले

४. कलियुगात देवी आणि श्रीगणेश यांची साधना लवकर फलद्रूप होते. त्यामुळे सद्गुरुद्वयींनी देवीची उपासना भावपूर्णरित्या केल्यामुळे देवीने प्रसन्न होऊन सर्व साधकांवर कृपावर्षाव केला.

५. वैष्णोदेवी, माहूर गडावरील श्रीरेणुकादेवी, वणीची सप्तशृंगीदेवी, नैनिताल आणि विंध्याचल येथील देवी, मैसुरू जवळील डोंगरावरील चामुंडादेवी, उत्तरेतील ज्वालादेवी आणि हिमालयावरील पार्वतीदेवी यांचे दर्शन कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाच्या ढिगार्‍यात झाले. कुंकवाच्या ढिगार्‍यातील उंचवटे देवीच्या पर्वतस्थानांचे प्रतीक असल्याचे जाणवले.

६. कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाच्या ढिगार्‍यात शिवाची अमरनाथ येथील बर्फाची पिंडी सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे दिसले. थोड्या वेळाने कुंकवाच्या ढिगार्‍यात एका शिवपिंडीचा आकार स्थुलातून निर्माण झाला. यावरून शिव आणि शक्ती यांची एकरूपता सिद्ध होते.

७. काही वेळानंतर कुंकवातून देवीचे मारक तत्त्व वातावरणात प्रक्षेपित झाले. तेव्हा कुंकवाच्या ठिकाणी ‘ज्वालामुखी बाहेर पडणारे डोंगर आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. त्यामुळे देवीचे पाताळातील अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध होऊन त्यांची शक्ती आणि सिद्धी न्यून झाल्याचे जाणवले.

८. कुंकुमार्चनाचे उपचार सूक्ष्मातून गुरुचरणी अर्पण झाले होते. त्यामुळे स्थुलातून कुंकू-पूजेतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर ठेवलेल्या फळांवर कुंकू उडाले होते.

९. कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाच्या ढिगार्‍यावर ‘ॐ’ ची आकृती निर्माण झाली. ‘ॐ’ ची आकृती हे कुंकवामध्ये देवीचे निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याचे आणि देवीला वाहिलेले पूजेतील उपचार पूर्णत्वाला गेल्याचे द्योतक आहे’, असे जाणवले.

१०. कुंकुमार्चन पूर्ण झाल्यावर त्यामध्ये डाव्या सोंडेच्या गणपतीची आकृती उमटली; कारण गणपतीची उत्पत्ती पार्वतीपासून, म्हणजे देवीपासून झालेली आहे. त्यामुळे गणपति आणि देवी यांच्यात एकरूपता असल्याचे जाणवले.

कृतज्ञता

‘देवी, तुझ्या कृपेनेच लक्षकुंकुमार्चनाला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

कु. मधुरा भोसले