लवकरच भारतात परतणार ! – ‘सिरम’चे अदार पूनावाला यांचे आश्‍वासन

अदार पूनावाला

लंडन – सहकुटुंब लंडन येथे गेलेले पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. एक दिवस आधी त्यांनी कोरोना लसीवरून भारतातील काही नेत्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला होता. सिरमकडून ‘कोविशील्ड’ लसीचे उत्पादन करण्यात येत आहे.

अदार पूनावाला यांनी सांगितले की, आमच्या भागीदारासमवेत ब्रिटनमध्ये झालेली बैठक यशस्वी ठरली आहे. मी लवकरच भारतात परतणार आहे. लसीच्या उत्पादनाची पहाणी करणार आहे.

सत्य बोललो, तर माझा शिरच्छेद केला जाईल !

मुख्यमंत्र्यांसह मोठ्या लोकांकडून धमक्या

अदार पूनावाला यांनी लंडन येथील एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मला दूरभाष करून लोक धमक्या देत आहेत. विशेष म्हणजे हे दूरभाष भारतातील प्रभावशाली व्यक्तींकडून केले जात आहेत. यांत मुख्यमंत्री, ‘इंडस्ट्री चेंबर्स’चे प्रमुख आणि इतर अनेक मोठ्या लोकांचा समावेश आहे. हे सगळेच मला दूरभाष करून तात्काळ लस पुरवठा करण्याची मागणी करत आहेत. सत्य बोललो, तर माझा शिरच्छेद केला जाईल.

सर्व लोकांना वाटते, ‘लस सर्वप्रथम मला मिळावी;’ परंतु लोकांनी अशाप्रकारे धमकी देणे समजण्यापलीकडे आहे. भारतात माझ्यावर लस पुरवण्याविषयी प्रचंड दबाव आहे. लोक अशी अपेक्षा करतील, असे वाटले नव्हते.