महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून वर्णिलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती !

‘शिव आणि श्रीविष्णु यांच्या कार्यासारखे परात्पर गुरु डॉक्टर यांचेही कार्य परिपूर्ण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वसिष्ठऋषि म्हणतात, ‘‘तुमचे सद्गुरु महान आहेत. प्रत्येक अध्यात्मप्रसाराचे कार्य त्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या कृपादृष्टीखाली होत आहे. त्यांची स्थिती शिव आणि श्रीविष्णु यांच्याप्रमाणे आहे. त्यांचे कार्य जसे परिपूर्ण, तसेच तुमचे कार्यही परिपूर्ण आहे. तुमच्या कार्याला शिव, श्रीविष्णु आणि सदाशिव (पार्वतीशी शिवाचा विवाह होण्यापूर्वीचे नाव) यांचा आशीर्वाद आहे. तुमच्या कार्याची सर्व जगात कीर्ती होईल, असेच आम्ही करणार आहोत.’’ (नाडीवाचन क्रमांक ५०, ९.१२.२०१५)


साधकांचे जीवन प्रकाशमान करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पृथ्वीवर अनेक गुरु आहेत; परंतु या गुरूंचेही जे गुरु आहेत, असे सत्यपुरुष गुरु तुम्हाला लाभले आहेत. गुरूंकडे पूर्ण आणि शुद्ध अध्यात्म आहे. याची कुणी परीक्षा करू शकत नाही. पाण्यात शेवाळे असते. आपण ते शेवाळे दूर करून आतील शुद्ध पाणी वापरतोच ना ? या शेवाळ्याप्रमाणे असलेले आपले प्रारब्धकर्म, दोष, चुका दूर करण्यासाठी आपण गुरूंकडे, देवाकडे येतो. अग्नीत लोह घातले, तर त्याचा रंग पालटतो. ते लाल आणि प्रकाशमान होते, तसेच सोन्याच्या संदर्भातही आहे. तसेच गुरूंकडे आलेल्या साधकाचेही होते. तोही गुरूंच्या सहवासाने प्रकाशमान होऊ लागतो. (नाडीवाचन क्रमांक ६२, २३.२.२०१६)