|
एका सैनिकावर हात उगारण्याचे धाडस होतेच कसे ? अशा कर्मचार्यांना अटक करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच निष्क्रीय पोलिसांचीही हकालपट्टी केली पाहिजे !
कोलार (कर्नाटक) – कोरोनाबाधित आईवर योग्य उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप करणारे सैनिक श्रीनिवास यांना श्रीनिवासपूर शासकीय रुग्णालयाच्या आवारात कर्मचार्यांकडून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हे आक्रमण करण्यात आले. तत्पूर्वी श्रीनिवास यांनी उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांच्याकडेही उपचाराविषयी तक्रार केली होती.
तमिळनाडू येथे कार्यरत असलेले श्रीनिवास यांची आई कोरोनाबाधित झाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिला पहाण्यासाठी श्रीनिवास पीपीई किट घालून रुग्णालयात गेले असता आई खाटेवरून खाली पडल्याने घायाळ झाल्याचे आणि तिच्यावर योग्य उपचार होत नसल्याचे आढळून आले. यावरून रुग्णालयातील कर्मचार्यांशी त्यांचा वाद झाला. दुपारी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी या रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी श्रीनिवास यांनी नारायण यांच्याकडे याविषयी तक्रार केली. याला आक्षेप घेणार्या कर्मचार्यांनी नंतर श्रीनिवास यांच्यावर आक्रमण केले. स्थानिकांनी या घटनेचे चित्रीकरण केले. रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी मारहाणीसाठी प्रोत्साहन दिले, असा आरोप श्रीनिवास यांनी केला.