गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५१ टक्के, तर ३६ मृत्यू ३ सहस्र १९ नवीन रुग्ण  

प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रुग्ण २० सहस्रांहून अधिक

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – राज्यात सलग दुसर्‍या दिवशी ३ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्ष उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० सहस्र ८९८ झाली आहे. राज्यात २९ एप्रिलला कोरोनाबाधित ३ सहस्र १९ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात कोरोनाविषयक ५ सहस्र ९१० चाचण्या करण्यात आल्या, तर या चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५१ टक्के आहे. २९ एप्रिल या दिवशी कोरोनाचा संसर्ग झालेले ९१४ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.

अधिक संख्येने कोरोनाबाधित रुग्ण असलेली आरोग्य केंद्रे

राज्यात मडगाव येथे १ सहस्र ९७४, कांदोळी १ सहस्र ५०४, पर्वरी १ सहस्र ३९२, पणजी १ सहस्र ३४३, कुठ्ठाळी १ सहस्र ३३१, फोंडा १ सहस्र २१९ आणि म्हापसा १ सहस्र २० या आरोग्य केंद्रांत १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. डिचोली ८१४, कासावली ८१२, सांखळी ७८४, वास्को ७७६, चिंबल ७२९, शिवोली ६७७ आणि पेडणे ५०५, ही आरोग्यकेंद्रे त्या खालोखाल रुग्ण असलेली आहेत.

आके, मडगाव येथील १९ वर्षीय युवकासह कोरोनाबाधित एकूण ३६ रुग्णांचे निधन

राज्यात २९ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित ३६ रुग्णांचे निधन झाले. कोरोना महामारीच्या काळातील हा एक नवीन उच्चांक आहे. विशेष म्हणजे या सूचीमध्ये आके, मडगाव येथील १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. या युवकाला कोणत्याही अन्य व्याधी नव्हत्या, तर त्याला मागील ७ दिवस कोरोनाची लक्षणे दिसत होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत युवकाचे निधन झाले. आज निधन झालेल्या ३६ पैकी १० रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत निधन झाले आहे. यामुळे कोरोनामुळे निधन झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १४६ झाली आहे.