अनुष्ठानाच्या तपोबलाने महामारीचा लय करूया ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

कुंडई तपोभूमीवर गायत्री मंत्र पुरश्‍चरण तथा सहस्रचंडी अनुष्ठानाला प्रारंभ

कुंडई – तप केल्याने आपली पुण्याई वाढते. आपल्या कुळामध्ये सुसंस्कार, आनंद नांदतो आणि सुखप्राप्ती होते. यासाठी तप करण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत समाज भयभीत झालेला वाटतो. आज लोक श्‍वास घेण्यास तळमळत आहेत. अशा प्रकारची भयानक परिस्थिती सर्वत्र पहात आहोत. यावरून आज प्रत्येकाला श्‍वास, आपल्यामध्ये असलेल्या ईश्‍वराची किंमत कळायला लागली आहे. शेवटी आध्यात्मिक सत्तेलाच शरण जावे लागेल, तेव्हाच विश्‍वकल्याण होईल. भारताकडे ऋषिमुनी प्रदत्त जे आध्यात्मिक वैभव आहे, त्यामुळेच भारत गुरुस्थानी विराजमान आहे. अनुष्ठानाच्या तपोबलाने महामारीचा लय करूया. आज या महामारीच्या काळात सर्वांनी आध्यात्मिक उपाय अवलंबला पाहिजे. घाबरण्याचे कारण नाही, तर सर्वांनी मने घट्ट करण्याची आवश्यकता आहे. या काळात आपण देवावर विश्‍वास ठेवून सकारात्मकता आत्मसात केली पाहिजे. दैवी शक्तीच्या सहकार्याने कोरोनाचे उच्चाटन करूया. कोरोनापासून वाचण्यासाठी दैवी शक्तीचा आधार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा या अनुष्ठानाच्या माध्यमातून सेवापरायण राहूया, यामध्येच सर्वांचे क्षेम आहे, असे संबोधन धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पिठाधीश्‍वर, आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुरूप श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपिठावर वैदिक पाठशाळा बटू -उपाध्याय या सर्वांच्या माध्यमातून वैश्‍विक महामारी समूल नष्ट होण्यासाठी, शत्रू, चिंता, भय यांचे निवारण, दुःख, क्लेश यांचा विनाश, स्वकुळ रक्षण तथा सर्वांना उत्तम स्वास्थ्य लाभावे, यासाठी ब्रह्मोत्तम मासात विशेष दैवीशक्तीचा उदय, महामारीचा लय होण्यासाठी २५ एप्रिल ते २४ मे २०२१ या कालावधीत ‘गायत्री मंत्र पुरश्‍चरण’ आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करत होते. तपोभूमी संस्थापक, राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मीभूत ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या स्मृतिदिनी दिव्य समाधी स्थानी महाभिषेक संपन्न करून गायत्री मंत्र पुरश्‍चरण तथा सहस्रचंडी अनुष्ठानाला प्रारंभ करण्यात आला. ५०० हून अधिक हिंदु धर्मियांनी ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून संकल्प करून अनुष्ठानाला प्रारंभ केला आहे.

अशा या गायत्री मंत्र पुरश्‍चरण आणि सहस्रचंडी अनुष्ठानाद्वारे देवाकडे प्रार्थना केली जाणार आहे की, पूर्ण गोवा या कोरोना विषाणूपासून मुक्त रहावा, त्याचप्रमाणे सर्वांना सुख, शांती, स्थिरता, उत्तम आरोग्य, इप्सित मनोकामना पूर्ण होऊन कल्याण व्हावे आणि दीर्घायुष्य लाभावे.

पुरश्‍चरणात सहभागी होण्याचे आवाहन

समस्त हिंदु धर्मियांना या पुरश्‍चरणात सहभागी होऊन घरोघरी हे पुरश्‍चरण करण्याची संधी प्राप्त होत आहे. या गायत्री मंत्र पुरश्‍चरणात सहभागी होऊन, दैवीशक्तीद्वारा कोरोना महामारीपासून स्वकुळ रक्षण करूया, असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पिठाद्वारे करण्यात आले आहे.

अनुष्ठानासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी – https://forms.gle/pPpJFLpUmqUjrBGL8

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. – ७५०७७७१७५३, ७५०७७७१७४६ आणि ७५०७७७१५६९