मुके बिचारे…!

यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. गुहेच्या बाहेरील परिसरात आग लावल्याने वाघिणीचा गुदमरून मृत्यू झाला. ती मेल्याची निश्‍चिती करण्यासाठी शिकार्‍यांनी तिच्या अंगावर जखमाही केल्या. त्यानंतर तिचे पंजे कापून नेले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले. या वाघिणीच्या पोटात ४ बछडेही होते.

संपूर्ण जगात ७० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे वाघ हे भारताचे वैभव आहे. भारतात वाघाला वाचवण्यासाठी ४ दशकांपूर्वीच मोठी मोहीम देशपातळीवर हाती घेण्यात आली होती. भारतात वर्ष १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्पांना आरंभ झाला. सध्या महाराष्ट्रात ५७ अभयारण्ये आहेत आणि देशातील ३७ व्याघ्र प्रकल्पांपैकी ६ व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. वर्ष २०१० मध्ये १ सहस्र ७०६ वाघ होते, तर वर्ष २०१६ मध्ये देशात २ सहस्र २२६ च्या आसपास वाघ होते. देशात सध्या ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेकडून वाघांना वाचवण्यासाठी मोहीम राबवली जाते. त्याचा हा परिणाम असू शकतो; तरीही आज भारतात मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार केली जाते. एकेकाळी राजे छंद म्हणून शिकार करायचे. शिकार करणे हे शौर्याचेही प्रतीक असायचे. सध्या वन्यप्राण्यांची शिकार ही अवैध मानली गेली आहे. अर्थात् सलमान खान आदींसारख्या शिकार्‍यांवर शेवटपर्यंत शिक्षेची कारवाईही होत नाही. त्यामुळेही शिकार्‍यांचे फावले आहे आणि मोठ्या प्रमाणात ही शिकार आजही चालू आहे.

काही गर्भश्रीमंतांच्या घराची शोभा वाढवण्यासाठी त्यांना वाघाचे कातडे हवे असते. भारतात वाघाची शिकार करणार्‍या आंतरराज्यीय टोळ्या कार्यरत आहेत. वाघाची कातडी आणि नखे यांना देशात अन् विदेशात मोठी मागणी आहे. काही वेळा मारलेल्या वाघाला कर्णावती येथे नेले जाते. तेथील महिला कातडे वेगळे काढण्याचे काम करतात, अशीही माहिती आहे. विशेष म्हणजे वाघाच्या कातडीच्या विक्रीचे मुख्य केंद्र चीन आहे. तिथे एक कातडे २५ ते ३० लाख रुपयांना विकले जाते. यावरून चीन कुठल्या कुठल्या क्षेत्रात भारताला नाचवतो आहे, हे लक्षात येईल.

रक्षक बनले भक्षक !

वनपर्यटन ही गोष्ट सध्या मध्यमवर्गियांमध्येही रूढ झाली आहे. पर्यटनाच्या नावाखाली वाघ दाखवण्याचा हा गोरखधंदा वाघांच्या जिवावर उठला आहे, असे अनेक प्राणीप्रेमींचे मत आहे. जिप्सीचालक सर्व नियम आणि मर्यादा यांचे उल्लंघन करतात. त्यामुळे वाघ बावचळून जातात. वनपर्यटनातून जंगलांची हानी होऊन प्राणी रस्त्यांवर येत असतील, तर त्याचा उपयोग होणार नाही. पर्यटक जंगलात जाऊन धिंगाणा घालतात, प्रशासन पर्यटनाच्या नावाखाली जंगलात रस्ते बांधते. बांधकामाच्या नावाखाली होणारी जंगलतोड, जंगलातील विविध वृक्ष, वनस्पती, पशू किंवा त्यांचे अवयव यांची तस्करी ही वनखात्यातील लोकांना ठाऊक नसते असे नाही; किंबहुना ते त्यात सहभागी असल्याशिवाय तस्करी किंवा शिकारी यांना जंगलात प्रवेश मिळणे आणि त्यातून ते मुद्देमालासह बाहेर येणे सोपे नाही. ज्यांनी जंगलांचे रक्षण करायचे ते वनखात्यातील कर्मचारी आणि अधिकारी वन्यजिवांचे भक्षक बनले आहेत, असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चित्र दिसते. गेल्या ५ वर्षांत वाघ मोठ्या प्रमाणात जंगलाच्या बाहेर येत असल्याचे सर्व जण पहात आहेत. मानवाने केलेल्या प्रचंड जंगलतोडीचे हे दुष्परिणाम आहेत. कित्येक ठिकाणी वाघांकडून जंगलांच्या शेजारील घरांमध्ये झोपलेल्या लहान मुलांना पळवणे, शेतात जाऊन शेतकर्‍यावर आक्रमण करणे अशा घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तहानलेले वाघ विहिरीतही पडत आहेत. जंगलातील घरांच्या अंगणात रात्रीच्या वेळी वाघ येऊन जात असल्याचे तेथील गावकरी नेहमीच सांगतात. त्यासाठी त्यांच्या कोंबड्या, कुत्रे यांना ते घरात ठेवतात. वाघांनी जंगल सोडून मुख्य र सर्वांनी पाहिले. सध्या पुण्यासारख्या ठिकाणी श्रीमंतांघरच्या ‘डॉगी’साठी हॉस्टेल्स आहेत; कोरोनाच्या काळात ती पूर्ण भरली आहेत. दुसरीकडे अनेक भटकी कुत्री सामान्य माणसांचे लचके तोडत आहेत. अशी भिन्न स्थिती आपल्या देशात आहे.

गोमातेचे रक्षणही तितक्याच पोटतिडकीने करा !

जसे वाघांचे रक्षण करायला हवे, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पोटतिडकीने शासनाने गायींचे रक्षण करायला हवे. वाघाच्या तुलनेत गाय हा मानवाला सर्वांगाने अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणारा पशू आहे; नव्हे तर श्रद्धाळू हिंदूंसाठी ती देवताच आहे. गोमातेचे माहात्म्य आणि गोरक्षणाचे सूत्र इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही; परंतु गोहत्या बंदीचा कायदा असूनही होणारा भ्रष्टाचार, निष्क्रीयता आणि धर्माभिमानाचा अभाव गोहत्या रोखू शकलेला नाही. जिच्याकडे मानवापेक्षाही श्रेष्ठ, सर्वकाही प्रदान करणारी ‘कामधेनू’ देवता आहे ती भारतभूमी आज गोमांसाच्या निर्यातीत अग्रक्रमावर आहे, यापेक्षा दुर्दैव दुसरे काही असू शकत नाही.

हिंदूंच्या देवतांची वाहने हे विविध पशू आहेत. साक्षात् आदीशक्तीचे वाहनच वाघ आणि सिंहही आहे. मूषक, नंदी, कासव, अश्‍व, सर्प, शेषनाग, श्‍वान, गोमाता, मयुर, गरुड, शूक, काक आदी देवतांसमवेत असलेले हे जीव केवळ पशू योनीतील न रहाता ते स्वतःच देवतास्वरूप किंवा ऋषिस्वरूप झाले आहेत ! तर स्वतः श्रीविष्णूनेच मत्स्य, वराह आदी प्राण्यांच्या रूपात, तर नृसिंहासारख्या सिंहाचे मुख असलेल्या अवतारांची धारणा केली आहे. हिंदु धर्म मूलतःच ‘निसर्ग देवो भव’ आहे. रामराज्यात मानवासमवेत पशूंनाही न्याय मिळतो; किंबहुना वातावरणातील सात्त्विकतेमुळे रामराज्यातील पशू साधना करणार्‍यांच्या जवळ येतात, तेव्हा त्यांच्यातील पशुत्व लोप पावते. त्यामुळे हिंदु राष्ट्रात गायीच काय वाघही सुरक्षित असतील, हे निश्‍चित !