कर्तव्यात कुचराई करणारे आणि जाब विचारल्यावर मारहाण करणारे असे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ?
पिंपरी – भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वाहतूक पोलिसाने पिंपरी-चिंचवड मुख्यालयातील पोलीस कर्मचार्याला लोखंडी गजाने मारहाण केली. या प्रकरणी वाहतूक पोलीस सूरज पोवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोडी हॅरिस पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. तेव्हा वाहतूक पोलीस त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित नव्हता. तक्रार करणारा पोलीस कर्मचारी किसन गराडे यांनी त्यांना दूरभाषवरून उपस्थित रहाण्याविषयी विचारणा केली. तेव्हा पोवार यांनी उद्धटपणे उत्तर दिले. आरोपीला नाकाबंदी असलेल्या ठिकाणी उपस्थित रहाण्यास सांगितल्यावर तो हातात लोखंडी गज घेऊन आला आणि त्याने पोलिसाच्या पायावर लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.