पुणे – प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर करण्यात आला आहे. डॉ. भटकर यांच्या पुणे येथील कार्यालयात हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इंन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे किर्लोस्कर समूहाचे संचालक कै. पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ. विजय भटकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे परम ८००० आणि परम १०००० असे महासंगणक बनविण्यात मोठे यश भारताला मिळाले आणि आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे सिद्ध केले, असेही प्रा. डॉ. चोरडिया यांनी सांगितले.