भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिवस पार पडला !

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने शाळांना ग्रंथ भेट देतांना राहुल चिकोडे (डावीकडून ४ थे)

कोल्हापूर – जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदिर, नेहरूनगर विद्यामंदिर या दोन शाळांना ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचे हस्ते वाचनीय पुस्तके देण्यात आली.

याप्रसंगी राहुल चिकोडे म्हणाले, आजच्या या पुस्तक दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी वाचनाचा संकल्प केला पाहिजे. सध्याच्या या तणावपूर्ण युगात जीवन तणावरहित होण्यासाठी मोठे साहाय्य होत आहे. पुस्तके ही सकारात्मक विचार येण्यासाठी मार्गदर्शक असतात. पुस्तके जीवनात अमुलाग्र पालट घडवतात. आपल्याला आयुष्य जगायला शिकवतात. ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व वयोगटातील वाचकांसाठी भरपूर पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. ग्रंथालयाच्या माध्यमातून सातत्याने वाचन संस्कृती वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात लहान मुलांना सायंकाळी ५ ते ७ या वेळेत विनामूल्य वाचनालय, पुस्तकांची वारी आपल्या दारी, या उपक्रमाच्या माध्यमातून विविध शाळांच्या पटांगणावर जाऊन मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तकांची गाडी उभी केली जाते.

याप्रसंगी नेहरूनगर विद्यालयाचे संजय पाटील, टेंबलाईवाडी विद्यालयाचे विलास पिंगळे, सचिन साळुंखे, जयदीप मोरे, कृष्णा आतवाडकर, विजय पाटील, शंतनु मोहिते, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कर आदी उपस्थित होते.