कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

करमाळ्यात रुग्णाला वाचवण्यासाठी खासगी डॉक्टरांनी रुग्णाला रस्त्यावरच लावला ऑक्सिजन !

करमाळा (जिल्हा सोलापूर) – करमाळ्यात २७५ खाटा उपलब्ध असतांना ५०२ बाधितांवर उपचार चालू आहेत. सर्व कोरोना उपचार केंद्रे पूर्ण भरलेली आहेत. त्यामुळे एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी एका खासगी डॉक्टरांवर रुग्णास थेट रस्त्यावरच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. यानंतर त्यांनी सदरच्या रुग्णास पुढील उपचारासाठी रवाना केले.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने ‘स्ट्रेचरवर’ ऑक्सिजन लावण्याची वेळ येत आहे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे म्हणाले, ‘‘उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी १० खाटांना ऑक्सिजनची सोय असून सर्व खाटा गेल्या ८ दिवसांपासून भरलेल्या आहेत. त्यामुळे तातडीच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्ट्रेचरवर झोपवून ऑक्सिजन देऊन उपचार केले जात आहेत.’’

सातारा जिल्ह्यातील नागरिकांची कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांकडून लूट !

सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – राज्यात खासगी प्रयोगशाळांकडून करण्यात येणार्‍या कोरोना चाचणीचे दर पुन्हा सुधारित करण्यात आले आहेत. आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीसाठी ५०० रुपये, तर अँटिजेन चाचणीसाठी आणि अँटिबॉडीज तपासणीसाठी १५० रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत; मात्र जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळांकडून सामान्य नागरिकांची लूट केली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राज्यशासनाने आतापर्यंत कोरोना चाचणीसाठीचे दर ५ ते ६ वेळा पालटून अल्प केले आहेत. प्रारंभी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीसाठी ४ सहस्र ५०० रुपये आकारले जात होते. आता याचा दर केवळ ५०० रुपये आकारण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांकडून या चाचणीसाठी सामान्य नागरिकांकडून ८०० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे अशा प्रयोगशाळांना शासनाने टाळे लावावेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

कोरोनाचे निदान विलंबाने झाल्याने उपचारही उशिरा चालू होणे आणि नंतर रुग्ण दगावणे !

एका शहरातील एका गृहस्थांचा अनुभव

एका गृहस्थांना ताप आला होता. तेव्हा स्थानिक आधुनिक वैद्यांनी सांगितले हा ‘व्हायरल’ ताप आहे. त्यामुळे त्यावर औषध दिले. पण ताप न्यून होईना म्हणून कोरोना चाचणी करायला सांगितली. ‘स्वॅब चाचणी अहवाल आल्याविना रुग्णालयात भरती करून घेणार नाही, असे सांगितले. हा चाचणी अहवाल येण्यात १ दिवस गेला.

त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता खाली ३ घंटे बसवून ठेवले. तिथे अन्य अत्यवस्थ रुग्ण पाहून त्यांची मनस्थिती बिघडली. त्यानंतर भरती करून घेतले; मात्र त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर बेडवर ठेवावे लागले आणि त्यानंतर त्यांचा १ दिवसात मृत्यू झाला. यामध्ये स्थानिक आधुनिक वैद्यांनी सावधगिरी म्हणून प्रारंभीच स्वॅब चाचणी करायला सांगितली असती, तर पुढील धोका कदाचित् टळू शकला असता.

मृत्यूंची संख्या वाढल्याने कोरोना रुग्णांना ज्या स्मशानात ज्या वेळी जागा उपलब्ध असते, तिथे न्यावे लागते !

सध्या कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने स्मशानात जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व स्मशानांचा आढावा घेऊन जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जावे लागते. ते स्मशान रुग्णालयापासून लांब असले, तरी तिथे मृतदेहाला घेऊन जावे लागते. तसेच ज्या वेळी स्मशानात जागा उपलब्ध आहे, त्या वेळी जावे लागते.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]