पुणे – क्वांटम् तंत्रज्ञानावर आधारित संशोधन करण्याची संधी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर) मिळाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि आयसर पुणे यांच्या वतीने ‘क्वांटम टेक्नॉलॉजीच्या संशोधनासाठी टेक्नॉलॉजी इनोवेशन हब’ची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून क्वांटम संगणक, क्वांटम व जनसंज्ञापन उपकरण अन् प्रणाली आणि सेन्सर्स विकसित करण्यात येणार आहेत. क्वांटम् तंत्रज्ञानामुळे संगणकीय प्रणालीमध्ये पालट होणार आहेत. तसेच संगणकीय गणिती प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकेल. आरोग्य, निगा, सुरक्षित जनसंज्ञापन, वाहतूक आणि नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे शक्य होईल.
आयसर पुणे येथील १३ संशोधन गट ‘क्वांटम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब’ अंतर्गत संशोधन करणार आहेत. या केंद्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने १ सहस्र ७०० कोटींचा निधी ५ वर्षांसाठी दिला आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी आयसर पुण्याला मिळाली, याचा विशेष आनंद आहे असे ‘आयसर पुणे’चे संचालक डॉ. जयंत उदगावकर यांनी सांगितले.