‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’चा कौतुकास्पद उपक्रम !
राजापूर, १९ एप्रिल (वार्ता.)- आताच्या काळात हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपले सण आणि उत्सव तिथीप्रमाणे साजरे करण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’च्या उपक्रमातून निर्माण झालेली ही दिनदर्शिका उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात ही दिनदर्शिका लावली गेली पाहिजे. या दिनदर्शिकमुळे आपल्या हिंदु धर्म आणि संस्कृतीचे एक प्रकारे धर्मशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले आहे, असे प्रतिपादन सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर यांनी येथे केले.
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (गुढीपाडवा) या हिंदु नववर्ष प्रारंभदिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूरच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या हिंदु पंचांग दिनदर्शिकेचे प्रकाशन पू. चंद्रसेन मयेकर यांच्या शुभ हस्ते विधीवत् पूजन करून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पू. चंद्रसेन मयेकर यांनी या पंचांग दिनदर्शिका निर्मितेचे विशेष कौतुक करून प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
या वेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर म्हणाले, ‘‘गुढीपाडवा हिंदु नववर्षा दिनी प्रारंभ होणारी, चैत्र ते फाल्गुन मराठी मासांप्रमाणे, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण अशी पाचही अंग असणारी पंचांग दिनदर्शिका हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने निर्माण करण्यात आली आहे. आपल्या धर्म आणि संस्कृती प्रमाणे तिथी, चंद्र, सण आणि ऋतू यांचा निसर्गाशी कसा संबंध आहे ? हे समजून घेण्यासाठी प्रत्येक घरात मार्गदर्शक असावी, अशी ही दिनदर्शिका आहे. ज्यांना ही पंचांग दिनदर्शिका हवी आहे, त्यांना स्वागत मूल्यात उपलब्ध आहे. दिनदर्शिकेसाठी आपली मागणी आम्हाला कळवा. ही दिनदर्शिका घेऊन आपली धर्म संस्कृती जपावी.’’
या वेळी प्रतिष्ठानचे सर्वश्री विवेक गुरव, राजीव राणे, प्रसाद नवरे, मंदार बावधनकर, नरेंद्र पावसकर, प्रसन्न देवस्थळी हे सदस्य उपस्थित होते. दिनदर्शिका मिळण्यासाठी सर्वश्री महेश मयेकर : ९४२२४२५७४०, विवेक गुरव : ८५५४०८९२६७, राजीव राणे ८०८७२७६५३५ किंवा अन्य सदस्यांकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.