काही खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही अन्यत्र हालवण्याच्या सूचना
मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा अभाव अशी स्थिती सध्या मुंबईत आहे. पुरवठादारांकडून वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे १७ एप्रिलच्या रात्री १६८ रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तातडीने हालवण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना हालवणे खरेतर कठीण आहे; मात्र महापालिकेने ते करून दाखवले. काही खाजगी रुग्णालयांमध्ये पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे तेथील रुग्णालय प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांना अन्यत्र हालवण्याची सूचना दिली.
ऑक्सिजनअभावी वांद्रे येथील भाभा, कुर्ला येथील भाभा, बोरीवली येथील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम्.टी. अग्रवाल आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर येथील १६८ रुग्णांना एका रात्रीतून विविध ठिकाणच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हालवण्यात आले.
ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे गोयल रुग्णालयातील रुग्णांची धावपळ !
अंधेरी येथील गोयल या खासगी रुग्णालयाला पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे अचानक दुपारच्या वेळी रुग्णालयातील प्रशासनाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होईल, अशा ठिकाणी रुग्णांना हालवण्याची सूचना रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. महानगरपालिकेच्या रुग्णालयांतही ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे अचानक ‘रुग्णांना कुठे न्यायचे ?’ हा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांपुढे निर्माण झाला. अनेक ठिकाणी संपर्क करूनही ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला.