चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीनच्या लसीविषयीची भीती आणि कोरोनाचा प्रभाव न्यून झाल्याने लोकांची लसीकरणाकडे पाठ

बीजिंग (चीन) – चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्‍वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे. सरकारने लस घेणार्‍यांना विनामूल्य अंडी आणि शॉपिंग कुपन देण्यासह किराणा मालावर सूट देण्याचे आमीष दाखवले आहे. चीन सरकारचे १ जूनपर्यंत देशातील ५६ कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य आहे.

१. चिनी तज्ञांच्या मते चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गात घट होत असल्याने लोक स्वतःला सुरक्षित समजू लागले आहेत. यामुळे ते लस घेऊ इच्छित नाहीत. चीनच्या लसीविषयी जगामध्ये भीती पसरल्यामुळेही लोक लस घेण्यास घाबरत असल्याचे नाकारता येत नाही, असे वृत्त आहे.

२. चीन सरकारचे म्हणणे आहे की, नियोजित कालावधीत लस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात येईल. प्रतिदिन लाखो लोकांना लस देण्यात येत आहे. २६ मार्चला ६१ लाख लोकांना लस देण्यात आली.