कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची संख्या वाढल्याने सोलापूरातील स्मशानभूमीत राखेचा खच !

सोलापूर – शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांसमवेतच खासगी रुग्णालयांमध्येही बेडची कमतरता भासत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांची राख उचलण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे येथील रूपाभवानी स्मशानभूमीत कोळसा, राख आणि हाडे यांचा खच साठत आहे.

मागील १० दिवसांपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भाग येथे कोरोनामुळे प्रतिदिन २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. शहरातील कोरोनाबाधित मृतदेहांवर रूपाभवानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. काही वेळा ग्रामीण भागातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गाव दूर असल्याने त्याचाही अंत्यसंस्कार येथेच केला जातो; मात्र सध्या मृतदेहांची संख्या वाढत असल्याने स्मशानभूमीतील जागा अपुरी पडत आहे.