पोलीस निरीक्षक प्रदीप काळे वारणा नदीच्या काठावर बेशुद्धवस्थेत आढळले

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे

कोल्हापूर, १५ एप्रिल – उजळाईवाडी विमानतळाचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे १४ एप्रिल या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास वारणा नदीच्या काठावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. काळे यांना पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या संदर्भात काळे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असा संदेश पाठवला होता, असे वृत्त काही संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते.

आत्महत्या अथवा तसा कोणताही प्रयत्न नाही ! – पोलिसांचा खुलासा

या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सामाजिक माध्यमांवर एक संदेश पाठवला आहे. या संदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वारणा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाची वृत्ते येत आहेत. त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मी स्पष्ट करतो की, हत्या अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कोणत्याही प्रकारची साधी जखमही झालेली नाही. या संदर्भात पोलीस अधीक्षक अधिक खुलासा करणार आहेत.