देहलीतील निजामुद्दीन मरकजमध्ये तबलिगींच्या प्रवेशावर निर्बंध घालता येणार नाहीत !

देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले

निजामुद्दीन मरकज

नवी देहली – देहलीतील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर मर्यादित प्रवेशसंख्येचे कोणतेही बंधन नसतांना केवळ निजामुद्दीन मरकजमध्येच तसे निर्बंध टाकता येणार नाहीत. अनुमती असलेल्या २०० लोकांची सूची मान्यच होणार नाही, अशा शब्दांत देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि देहली पोलीस यांना सुनावले.

१. गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल मासांमध्ये येथे तबलिगींनी केलेल्या गर्दीमुळे देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटले गेले होते. त्याच आधारावर निजामुद्दीन मरकजमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणार्‍या व्यक्तींच्या संख्येवर निर्बंध घातले जावेत, अशी मागणी केंद्र सरकार आणि देहली पोलीस यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यांनी मरकजमध्ये प्रवेश करण्याची अनुमती असलेल्या २०० लोकांची सूची बनवली जाईल आणि त्यापैकी केवळ २० लोकांना एका वेळी या परिसरात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

२. या निकालावेळी न्यायालयाने निजामुद्दीन मरकज परिसराची निरीक्षकांच्या माध्यमांतून पहाणी केली जावी, असा आदेश दिला. पहाणी करून किती लोकांना एका वेळी तिथे प्रार्थना करता येऊ शकते, यासंदर्भातील अहवाल स्थानिक प्रशासनाला सादर करण्यास न्यायालयाने सांगितले.