हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

महंत बाबा हरपाल दास (मध्यभागी) यांना कुंभपर्व विशेषांक भेट देतांना डावीकडे समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा

हरिद्वार, ११ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा आणि धर्मप्रेमी श्री. संजय पुंडिर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

महंत बाबा हरपाल दास यांना धर्मकार्य करणार्‍यांविषयी पुष्कळ प्रेम आणि आदर आहे. संपर्काच्या वेळी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले, तसेच त्यांना कुंभपर्व विशेषांक भेट देण्यात आला. या वेळी त्यांनी शिष्यांसहित प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे सांगितले.