लोकप्रतिनिधींनी असे वागणे दुर्दैवी !
सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला ? असे विचारत माण तालुक्यातील वळई गावचे सरपंच बबन काळेल, ग्रामपंचायत सदस्य सोपान काळेल आणि त्यांचे सहकारी यांनी गुरुदास काळेल यांना लाकडी काठी, दगड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
गुरुदास काळेल यांनी गावातील गायरान जमिनीवर असणार्या घरांचे ‘८ अ’चे उतारे मिळावेत, यासाठी ७ एप्रिल यादिवशी ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला होता. याविषयी माहिती मिळताच त्याच दिवशी सायंकाळी सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल आणि इतरांनी माहिती अधिकारात अर्ज का दिला, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास प्रारंभ केला. तसेच गुरुदास यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. घायाळ झालेल्या गुरुदास यांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. गुरुदास काळेल यांच्या तक्रारीवरून सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल आणि सहकारी यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.