१. श्री. प्रेमानंद कामत (धर्मप्रेमी), पणजी, गोवा.
१ अ. भावसोहळ्यात कृतज्ञतागीत चालू असतांना भावजागृती होणे आणि सोहळ्यानंतरही भावस्थिती टिकून रहाणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तचा भावसोहळा दोन दिवस बघायला मिळाला. या दोन्ही दिवशी भावसोहळा पहातांना मला आनंद जाणवला. सोहळ्याच्या वेळी कृतज्ञतागीत चालू असतांना माझी भावजागृती होत होती आणि ती भावस्थिती सोहळ्यानंतरही टिकून होती. त्या वेळी ‘सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जायचे आहे’, असा माझा विचार झाला.
२. सौ. मीना कामत, पणजी, गोवा
२ अ. भावसोहळा पहात असतांना आनंद आणि उत्साह जाणवणे अन् चैतन्य ग्रहण होणे : मला भावसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता. मी एकाग्रतेने भावसोहळा पहात होते. माझा श्वास मंद गतीने चालू होता. त्या वेळी ध्वनीमुुद्रित केलेले काही सोहळेही दाखवण्यात आले.
१. त्यातील ‘श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्री बगलामुखीदेवीचे पूजन करत आहेत’, याविषयीची चित्रफीत दाखवत असतांना ‘देवीची माझ्यावर सतत कृपा आहे’, या भावाने माझी भावजागृती होत होती.
२. ‘श्री भवानीमातेच्या मूर्तीचे रामनाथी आश्रमात झालेले आगमन’, चित्रफीत पहातांना माझे मन भरून आले.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांंनी घेतलेला सत्संग’ पहात असतांना ‘मी आनंदाने आणि चैतन्याने न्हाऊन निघत आहे’, असे मला जाणवत होते.
संपूर्ण भावसोहळ्यात माझ्याकडून चैतन्य ग्रहण होत होते.
२ आ. कार्यक्रमानंतर थकवा येणे : माझ्याकडे कार्यक्रमाची ‘ऑनलाईन’ जोडणी करण्याची सेवा होती. कार्यक्रम झाल्यावर मी साहित्य आवरून ठेवल्यानंतर मला गळून गेल्याचे जाणवले.
२ इ. भावसोहळा पहातांना भावजागृती होणे आणि गुरुदेवांचे रूप दिसल्यावर अनाहतचक्रावर संवेदना जाणवणे
१. सकाळी मला घरात थोडा दाब जाणवत होता. घराची शुद्धी केल्यानंतर मला चांगले वाटले.
२. भावसोहळा चालू असतांना माझी भावजागृती होत होती. पू. आनंदी पाटीलआजी आणि पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांच्या अनुभूती ऐकतांना मला आतून हुंदकेे येऊन माझा भाव जागृत होत होता. प.पू. गुरुदेवांचे रूप दिसताच प्रत्येक वेळी मला अनाहत चक्रावर चांगल्या संवेदना जाणवत होत्या आणि माझा भाव जागृत होत होता.
३. सौ. शैला देसाई, किटल, फातर्पा, गोवा.
३ ई. ‘गुरुपादुका हृदयात स्थापन झाल्या आहेत’, असे अनुभवणे आणि ‘संतांनी केलेल्या यज्ञांमुळे प.पू. गुरुमाऊली सर्व साधकांचे रक्षण करत आहे’, असे जाणवणे : गुरुदेवांचे पादुका पूजन झाल्यावर ‘प्रत्येक साधकाच्या हृदयात पादुका स्थापन करायच्या आहेत’, असे सांगितले. त्या वेळी ‘मी फूल बनून गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाले आहे आणि गुरुपादुका माझ्या हृदयात स्थापन झाल्या आहेत’, असे मला अनुभवायला आले. त्यानंतर ‘मी विष्णुलोकातच आहे’, असे मला जाणवत होते आणि माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. आश्रमात ‘संतांनी केलेल्या यज्ञांमुळे प.पू. गुरुमाऊली सर्व साधकांचे रक्षण करत आहे’, हे पाहून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.
सौ. शैला देसाई, किटल, फातर्पा, गोवा यांना आलेल्या अनुभूती
१. प.पू. गुरुदेवांची मानसपूजा केल्यावर गणपति दिसून भाव जागृत होणे
५.५.२०२० या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी प्रार्थना करून प.पू. गुरुदेवांची मानसपूजा केली. मी ‘वक्रतुंड महाकाय…।’ हा श्लोक म्हणतांना माझ्या डाव्या बाजूला साक्षात् गणपति अधांतरी बसल्याचे मला दिसले. ते पाहून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
२. दळणवळण बंदीमुळे कापूर उपलब्ध होत नसतांना सूक्ष्मातून कापराचे उपाय करणे आणि त्या वेळी भगवान शिवाचे दर्शन होणे
११.५.२०२० या दिवशी माझ्या जवळील कापूर संपत आला होता. दळणवळण बंदीमुळे सनातन-निर्मित कापूर उपलब्ध होत नव्हता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार मी सूक्ष्मातून हातात कापूर घेतला. मी ‘कापराची पूड म्हणजे साक्षात् शिवाच्या चरणांची धूळ आहे’, असा भाव ठेवला. मी ती हातावर घेऊन त्याचा सुगंध घेत डोक्यापासून मानेला आणि दोन्ही खांद्यावरून हाताला लावल्यावर मला जांभया येऊन मला आध्यात्मिक लाभ झालेे. या वेळी प्रत्यक्ष भगवान शिव माझ्या उजव्या बाजूला बसल्याचे मला दिसले. कापूर उपलब्ध होत नसतांना देवाने मला ही अनुभूती दिली. यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |