पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पथकर दरवाढ मागे घेण्याची खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांची मागणी !

पथकर दरात केलेली ५ टक्के दरवाढ अन्यायकारक

पुणे, ४ एप्रिल – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग आणि सेवा रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तरीही या महामार्गावरील आनेवाडी आणि खेड शिवापूर पथकर नाक्यावरील पथकर दरात केलेली ५ टक्के दरवाढ ही अन्यायकारक असून प्रवासी अन् नागरिक यांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. हे काम वर्ष २०१३ मध्येच पूर्ण होणार होते; मात्र अजूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ५ टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या दरात ५ टक्क्यांपेक्षा अधिक कपात करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी सातार्‍याचे भाजपचे खासदार श्रीमंत उदयनराजे यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने या दोन्ही पथकर नाक्याच्या वसुलीचा ठेका उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित आस्थापनाकडून काढून घेतला आहे.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतांना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत कि नाहीत, हे सुद्धा समजत नाही, रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. या आणि अशा सारख्या अनेक सुविधांची असलेली वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथेंरिटी ऑफ इंडियाने) आणि पथकर नाका चालवणार्‍या रिलायन्स व्यवस्थापनाने पथकर दरवाढ करून, प्रवासी आणि वाहनचालक यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.’’