सिंधुदुर्ग – महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला निधी प्राप्त होतो; मात्र जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटी रुपये; म्हणजे केवळ ३५ टक्केच निधी व्यय झाला आहे. उर्वरित निधी व्यय झाल्याचे दाखवण्यासाठी ३१ मार्चला मध्यरात्रीपर्यंत अनावश्यक योजनांवर देखील हा निधी व्यय झाल्याचे दाखवण्याचे पराक्रम होणार आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होऊन निकृष्ट कामांचा फटका सर्वांनाच बसणार आहे. याला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप सर्वस्वी उत्तरदायी असणार आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हरि खोबरेकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेला मिळालेला निधी अखर्चित राहिल्याविषयी खोबरेकर पुढे म्हणाले, ‘‘खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य अनेक वेळा राज्यशासनाकडून निधी मिळत नसल्याचे करत असलेले आरोप खोटे होते, हे सिद्ध होते. राज्यशासनाने जिल्हा परिषदेसाठी भरघोस निधी देऊनही सत्ताधार्यांना तो व्यय करता आला नाही. यामुळे जनता विविध योजनांपासून वंचित राहून जनतेची मोठी हानी झाली आहे.’’