उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रार्थना महेश पाठक ही एक आहे !
फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.३.२०२१) या दिवशी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने पुणे येथील साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत.
(वर्ष २०२० मध्ये कु. प्रार्थना महेश पाठक हिची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के होती. – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सौ. मीना गोले, सिंहगड रस्ता, पुणे.
१ अ. अनेक घंटे पाळण्यात शांतपणे खेळणारी प्रार्थना !
१. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे कु. प्रार्थनाच्या जन्मानंतर मला तिचा सहवास अखंड लाभला. ती ६ – ८ मासांची असतांना सौ. मनीषाताई तिला घेऊन सत्संगाला यायच्या. सौ. मनीषाताई सेवेत असतांना प्रार्थना अनेक घंटे शांतपणे पाळण्यात खेळायची. त्या वेळी ‘हे दैवी बालक वेगळे आहे’, असे आम्हाला जाणवत होते.
२. सौ. मनीषाताई यांच्याकडे भावसत्संग असायचा. त्या वेळी ती १ वर्षाची असूनही ३ ते ४ घंटे बाळकृष्णाच्या समवेत खेळायची. ‘श्रीकृष्णलोक हेच जणू तिचे विश्व आहे’, असे मला वाटायचे. तिच्याकडे पाहिले, तरी ‘तिची आतून साधना चालू आहे’, असे मला जाणवायचे.
१ आ. समजंस
१ आ १. समजूतदारपणे बालसाधकांना सांभाळणे : सर्व बालसाधक एकत्र आले की, ‘त्यांचाही एक सत्संग चालू व्हायचा. तिच्यापेक्षा लहान बालसाधकांना ती जणू मोठ्या ताईप्रमाणे खेळवायची. ती त्यांना आपला खाऊ द्यायची. ते रडत असतांना त्यांना मायेने जवळ घ्यायची आणि ‘आई सत्संगात आहे. आपण शांतपणे खेळूया’, असे सांगायची.
१ आ २. आई सेवेहून उशिरा आल्यावर आईला ‘तुझी सेवा पूर्ण झाली का ?’, असे विचारणारी प्रार्थना ! : मनीषाताईंनी प्रार्थना लहान आहे; म्हणून सेवा कधीच थांबवली नाही. प्रार्थना एक वर्षाची असल्यापासून मनीषाताई प्रार्थनाला साधकांकडे सोडून सेवेला बाहेर जायच्या. एकदा प्रार्थना ४ वर्षांची असतांना मनीषाताई तिला माझ्याकडे सोडून सेवेला गेल्या होत्या. तेव्हा मनीषाताईंनी दूरभाष करून प्रार्थनाला सांगितले, ‘‘मी सेवेत आहे. मला वेळ लागणार आहे.’’ तेव्हा प्रार्थनाने त्यांना शांतपणे सांगितले, ‘‘ठीक आहे. तू सर्व सेवा पूर्ण करून ये.’’ नंतर मनीषाताई उशिरा आल्यावर तिने त्यांना विचारले, ‘‘आई, तुझी सेवा पूर्ण झाली का ?’’
१ इ. इतरांचा विचार
एकदा मी सेवाकेंद्रात स्वयंपाकघरात भांडी घासत होते. तेव्हा प्रार्थना माझ्या जवळ येऊन मला म्हणाली, ‘‘मावशी, बस ना. आता तुझा हात दुखेल.’’ तेव्हा माझी भावजागृती होऊन ‘ही चिमुकली इतरांचा केवढा विचार करते’, असा विचार माझ्या मनात आला.
१ ई. त्यागी
प्रार्थना तिला खाऊसाठी मिळालेले पैसे अर्पणपेटीत टाकायची.
१ उ. लहानपणीच संत होण्याचे मोठे ध्येय ठेवणारी प्रार्थना !
कुणी तिला विचारले, ‘‘तू मोठी झाल्यावर काय होणार ?’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘संत !’’ तिच्या या शब्दाने माझी अंतर्मुखता वाढायची. तिच्या समवेत राहिल्याने मला शांत आणि स्थिर वाटायचे. मला ‘तिचा सहवास अखंड मिळावा’, असे वाटायचे.
१ ऊ. भाव
१. कुणाच्याही घरी रहावे लागले, तरी सर्व ठिकाणी ती ‘आश्रम’ या भावाने रहायची.
२. सद्गुरु कु. स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) पुणे येथे येणार असायच्या. तेव्हा ‘सद्गुरु ताई येणार, सद्गुरु ताई येणार’, असे म्हणत ती दिवसभर आनंदाने नाचायची.
१ ए. कृतज्ञता
सौ. मनीषाताई आणि श्री. महेशदादा यांनी तत्त्वनिष्ठ राहून या चिमुकल्या जिवावर फार चांगले संस्कार केले आहेत. फारच गुणी आणि दैवी हालचाली असणार्या प्रार्थनाची गुणवैशिष्ट्ये लिहिण्यासाठी कागद अपुरा पडेल. ‘हे परमदयाळू गुरुराया, आपण मला प्रार्थनाच्या सहवासात ठेवून माझ्यावर अनंत कृपाच केली, यासाठी कृतज्ञता गुरुराया !’
२. सौ. शारदा हुमनाबादकर, पुणेे
२ अ. अतिशय शांत असलेली दैवी बालिका !
‘कु. प्रार्थना ही दैवी बालिका आहे, हे अगदी ती ३ मासांची बाळ होती’, तेव्हाच आमच्या लक्षात आले. तेव्हा गणेशोत्सवानिमित्त उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात ‘फ्लेक्स’ प्रदर्शन सेवेसाठी सौ. मनीषाताई तिला घेऊन आल्या होत्या. मनीषातार्ई दिवसभर सेवेत होत्या; पण पूर्ण दिवसभरात बाळाचा एकदाही आवाज आला नाही. ती अतिशय शांत होती.
२ आ. एवढ्या लहान वयात स्वतःचा अभ्यास करून त्याचे चिंतन लिहिणारी प्रार्थना !
जून २०१९ मध्ये झालेल्या एका शिबिराला सौ. मनीषाताईच्या समवेत प्रार्थनाही जाणार होती. तेव्हा ती ८ वर्षांची होती. शिबिराची सिद्धता करतांना ‘मागील वर्षभरात आपण काय शिकलो ? कुठे अल्प पडलो ? आणि पुढील वर्षात काय शिकणार ? स्वतःमध्ये काय पालट करणार ?’, असा मनीषाताईंचा अभ्यास चालू होता. त्या वेळी प्रार्थनानेही स्वतःचे चिंतन अतिशय नेमकेपणाने लिहून काढले होते.
२ इ. शिकण्याची वृत्ती
विज्ञापनाची सेवा करता येण्यासाठी तिने मराठी टंकलेखन शिकण्यास आरंभ केला. काही भाग ती लगेच शिकली. विज्ञापनांची संरचना शिकण्याचीही तिची इच्छा होती.
२ ई. प्रेमभाव
विज्ञापन सेवांच्या कालावधीत माझा वाढदिवस होता. तेव्हा प्रार्थनाने सुंदर शुभेच्छापत्र सिद्ध केले आणि शुभेच्छापत्र अन् खोडरबर मला भेट दिले. ‘तू सेवा करतेस ना ?’, म्हणून दिले’, असेही तिने मला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘तिच्या खोडरबराने माझा सर्व भूतकाळ संपला.’ खरोखर मला फार आनंद मिळाला. तिने या सर्व कृती तत्परतेने आणि अतिशय शांतपणे केल्या.
२ उ. सेवाभाव
‘देयके आणि पावत्या यांचे वर्गीकरण करणे, त्याचे गठ्ठे करणे’, या सेवांमध्ये ती अतिशय मनापासून सहभागी व्हायची. प्रार्थनाला शाळेत सोडणे आणि आणणे, तसेच विविध स्पर्धांसाठी तिला सिद्ध करून घेऊन जाणे, उदा. नवरात्रीत नऊवारी साडी नेसवून सर्व दागिने घालणे, नृत्यस्पर्धेसाठी सजवणे’, हे सर्व तिचे लाडके बाबा श्री. महेशदादा अतिशय प्रेमाने करतात. तिला काही हवे असेल, तर ती खरेदीही ते त्यांच्या सेवांच्या एवढ्या व्यस्ततेत करतात. ‘ते हे सर्व कसे जमवतात ?’ ही गुरुकृपाच आहे !’
३. सौ. मानसी सोन्ना, सिंहगड रस्ता, पुणे.
३ अ. आनंद देणारी प्रार्थना !
‘प्रार्थना आमच्या घरी येते, तेव्हा माझ्यासहित घरातील सर्व व्यक्तींना आनंदाची अनुभूती येते. तेव्हा घरातील सर्व जण शांत आणि स्थिर वाटतात.
३ आ. आवडनावड नसणे
इतक्या लहान वयापासूनच तिचे खाण्यापिण्याविषयी कधी कुठलेही गार्हाणे नसते. जे समोर येईल, ते ती आनंदाने स्वीकारते. एखादी गोष्ट नको असेल, तर ती नम्रतेने सांगते.
३ इ. विचारून घेणे
तिला एखाद्या गोष्टीचा निर्णय घेता येत नसेल, तरी ‘ती समोरच्याला काय वाटेल ?’ यापेक्षा ‘आईला (मनीषाताईला) विचारूया’, असे सांगते आणि त्या जे काही सांगतील, ते ती स्वीकारतेही.
३ ई. अनेक वेळा ‘घडणारी प्रत्येक गोष्ट हे कृष्णाचे नियोजन आहे’, असा तिचा भाव मला जाणवला आहे.
३ उ. सतत वर्तमान स्थितीत रहाणारी प्रार्थना !
प्रार्थनाचे प्रतिदिनचेे नियोजन फार वेगवेगळे असते. ‘ती सकाळी कुठे रहाणार ?’ आणि ‘दुपारी कुठे रहाणार?’, असे तिचे वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन होत असूनही या सर्वांचा तिच्या वैयक्तिक गोष्टींवर कुठलाही परिणाम होत नाही. शाळेतील सर्व उपक्रमांत ती उत्साहाने सहभागी होते. तिचा सर्व अभ्यासही पूर्ण असतो. तिने मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची मर्जी संपादन केली आहे.
३ ऊ. एवढ्या लहान वयातही हिंदु राष्ट्राचा विचार असणारी प्रार्थना !
‘माझी मुलगी अर्चिता आणि प्रार्थना एकाच वर्गात शिकतात. बर्याचदा ‘त्या दोघी बहिणी आहेत का ?’, असे विचारले जाते. असेच एकदा एका काकूंनी विचारले असता मी त्यांना सांगितले, ‘‘नाही. त्या सख्ख्या मैत्रिणी आहेत.’’ त्यावर प्रार्थनाने ‘हिंदु राष्ट्रात सर्व जण सारखेच दिसणार आहेत’, असे वक्तव्य केले.’
(क्रमशः उद्याच्या अंकात)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |