सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्याची मागणी

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाची लस कधी देणार ? असा प्रश्‍न सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर आणि जिल्हा संघटक अजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पावसकर आणि शिंदे यांनी म्हटले आहे की,

१. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नजिक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा डोस देणे चालू झालेले असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला लसीकरणामध्ये सापत्न भावाची वागणूक का दिली जाते ?

२. आठ दिवसांपूर्वी देवगड येथील एका शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता आणखी बळी जायच्या अगोदर लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करून शिक्षण क्षेत्राला दिलासा द्यावा.

३. दळणवळण बंदीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ‘कोविड योद्धा’ म्हणून सेवा केली आहे. शिक्षकांना प्रतिदिन शेकडो विद्यार्थ्यांसमोर जावे लागते. शिक्षक सुरक्षित राहिले, तर विद्यार्थी सुरक्षित रहातील.