गणेशचतुर्थीनिमित्त १० सहस्र गोमय श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार ! – महेश संसारे

वैभववाडी – प्रदूषण टाळण्यासाठी सात्त्विक गोमय श्री गणेशमूर्ती काळाची आवश्यकता बनली आहे. यावर्षी १० सहस्र श्री गणेशमूर्ती आम्ही बनवणार आहोत. आस्थापनाच्या वतीने जिल्ह्यात १०० जणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन मूर्तीकार सिद्ध करण्याचा उद्देश आहे. यावर्षीच्या गणेशचतुर्थीपूर्वी १० सहस्र श्री गणेशमूर्ती सिद्ध करून त्यांची पुणे, मुंबई येथे विक्री व्यवस्था करण्याचा संकल्प आस्थापनाने केला आहे, असे प्रवण शेतकरी उत्पादक आस्थापनाचे अध्यक्ष महेश संसारे यांनी सांगितले.

(‘प्रदूषण होऊ नये’, हा हेतू चांगला असला, तरी त्यासाठी निवडलेला पर्याय धर्मशास्त्र संमत नाही. गोमयापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती ही अशास्त्रीय आहे. याचे कारण असे आहे की, गोमय किंवा गोमूत्र यांमध्ये मुळातच गोमातेचे तत्त्व असते. शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे निसर्गत:च गोमातेचे तत्त्व असलेल्या गोमयात गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही. अध्यात्मशास्त्रानुसार म्हणजेच मूर्तीशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. अशा श्री गणेशमूर्तीमध्ये श्री गणेशतत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होऊन त्याचा भाविकाला लाभ होऊ शकतो. अध्यात्मशास्त्रानुसार केलेली कुठलीही गोष्ट ही निसर्गाच्या जवळ जाणारी, म्हणजे पर्यावरणाला अनुकूल अशीच असते ! – संपादक)

लुपीन फाऊंडेशन आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लुपीनचे जिल्हा प्रकल्प अधिकारी योगेश प्रभु, संतोष कुडतरकर, प्रशिक्षक मळगावकर, सचिन म्हापुस्कर, मंगेश कदम, सुहास सावंत, प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते.