नवी देहली – चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले. भारताच्या नियंत्रणात असलेल्या पूर्व लडखमध्ये चिनी सैनिक अजूनही तैनात असल्याचा दावा चुकीचा आहे. चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की,
१. या क्षेत्रात सीमेवर तणाव असतांना जेवढे सैन्य तैनात होते, ते कायम आहे. सीमा भागात अद्याप गस्त चालू झालेली नाही; कारण अजूनही सीमेवर मोठा तणाव आहे आणि संघर्षाची स्थिती कायम आहे. एकूण सीमेवरील संपूर्ण स्थिती पहता आपला पाया भक्कम आहे आणि आपण आपल्या सर्व उद्देशांत यशस्वी होऊ.
२. ‘एप्रिल २०२० मध्ये चिनी सैनिक भारताच्या नियंत्रणात असलेल्या भूभागात घुसले होते. तिथे अजूनही चिनी सैनिक ठाण मांडून आहेत का?’ या प्रश्नावर ते म्हणाले की, असे काही भाग आहेत जे कुणाच्याही नियंत्रणात नाहीत. यामुळे जेव्हा आपण त्यावर नियंत्रण मिळवतो तेव्हा ते आपल्या कह्यात असतात आणि जेव्हा चीनकडून त्यावर नियंत्रण मिळवले जाते, तेव्हा तो भाग चीनच्या कह्यात असतो.
३. प्रत्यक्ष नियंत्रणरेषा निश्चित नसल्याने वादाचे सूत्र हे ’ग्रे’ झोनमुळे आहे. यामुळे दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. जोपर्यंत सैनिक या क्षेत्रातील मागील भागातून हटत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील स्थिती सामान्य झाली, असे म्हणता येणार नाही.