देहली – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक ‘अॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि अकोला यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ घंट्यांत २८ सहस्र रुग्ण संख्येची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यात २५ मार्च मध्यरात्री ते ४ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित !
बीड – वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: बंद असून किराणा दुकाने सकाळी ७ ते ९ या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दूध विक्री आणि वितरण सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच राहील; तथापि दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार चालू ठेवता येईल. सकाळी ७ ते १० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला आणि फळे यांची विक्री करता येईल. याचप्रकारे नांदेड जिल्ह्यातही २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ४ एप्रिलअखेर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.