मास्क न लावल्याविषयी विचारणा केल्याच्या रागातून तरुणाकडून कृत्य
कणकवली – शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी एका तरुणाला मास्क न लावल्याविषयी विचारणा केली. या रागातून तरुणाने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या वेळी तेथे जमलेल्या जमावाने त्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुण मास्क न लावता फिरत होता. त्यामुळे पोलीस आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी त्याला कारवाई करण्यासाठी अडवले अन् दंड भरण्यास सांगितला. त्या वेळी त्या तरुणाने दंड भरण्यास नकार देत पोलीस आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला थांबवून ठेवत पोलिसांनी मास्क न लावता फिरणार्या इतरांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला. ही संधी साधून तो तरुण दुचाकी घेऊन पसार झाला. त्या वेळी तो दंडाच्या भीतीने पळाला असावा, असे सर्वांना वाटले; मात्र थोड्या वेळाने पुन्हा आलेल्या त्या तरुणाने सोबत बाटलीतून आणलेले पेट्रोल एक पोलीस कर्मचारी आणि दोन नगरपंचायत कर्मचारी यांच्यावर फेकले अन् काड्यापेटी घेऊन आग लावण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क झालेल्या पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ कह्यात घेतले.