१९ मार्च २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…
फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे. माझ्यासाठी माझी मातृभूमी माझ्या गुरुदेवांचे समष्टी रूप आहे, त्यांचे चरण म्हणजेच माझी मातृभूमी आहे. दोेष आणि अहंकार यांच्या कैदेत अडकलो असतांना मध्ये मायेचा हा महासागर आहे. माझी मातृभूमी असंख्य संकटे आणि आघात यांच्या कैदेत असतांना माझी आई अन् हिंदु राष्ट्र यांमध्ये हा अधर्माचा महासागर आहे. मी पुन्हा यातून कधी त्या गुरुचरणी एकरूप होईन ठाऊक नाही. त्याचसाठी या अहंकाराच्या बंदीवास्थेत माझ्या आईची म्हणजे गुरुमाऊलीची आठवण मला आली आणि त्या गुरुचरणांशी अन् गुरूंच्या समष्टी रूपाशी म्हणजे या भारतमातेशी एकरूप होण्यासाठी माझा जीव व्याकूळ होऊन मी त्यांच्या चरणी आत्मनिवेदन अर्पण करत आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, यासाठी या मायासागरावर अन् अधर्माच्या सागरावर रागावून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या महान गीताचा आधार घेऊन स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राच्या ध्येयाला गवसण्यासाठी मातृभूमीरूपी गुरुचरणी आर्ततेने त्या मायासागराला तिचा सुपुत्र आवाहन करत आहे आणि सांगत आहे….
ने मजसी ने परत मातृभूमीूला ।
सागरा प्राण तळमळला ॥
मला माझ्या हिंदु राष्ट्र असलेल्या मातृभूमीकडे जायचे आहे, माझे अनेक हिंदुबांधव आज अनेक हालअपेष्टा सहन करत आहेत. माझी मातेसमान हिंदु स्त्री, देवतांची मंदिरे, गोमाता आज संकटात आहे, हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये दुफळी होत असतांना माझा प्राण हिंदूंच्या एकसंघतेसाठी आणि माझ्या गुरुचरणांसाठी तळमळतो आहे.
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
‘सागरा, तू माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस. त्या वेळी तू मला म्हणालास आणि मी तुझ्या मायासागरामध्ये अडकलो, मला गुरुचरणांचा भवसागर अन् क्षीरसागर हवा आहे, त्या वेळेला मायेच्या सागरात असतांना तू मला मैत्रीने म्हणालास की, चल जरा फिरायला जाऊ दुसर्या देशात आणि मी अडकून गेलो दोष अहंच्या जाळ्यात. माझ्या गुरूंच्या चरणांशी जे आहे, ते तुझ्याकडे नाही. दुसर्या देशात दोष अहंचेच राज्य होते. त्यामध्ये त्यांनी मला बेड्या ठोकल्या आणि मी अजूनही त्या ओझ्याखालीच आहे.
तइं जननी-हृद विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरि तया परत आणीन
हे मायासागरा, त्याच वेळेला माझ्या आईच्या (गुरुमाऊलीच्या) हृदयात माझा तिला आणि तिचा मला विरह होईल कि काय ? अशी शंका आली; पण तू तिला वचन दिलेस की, मी मार्गज्ञ म्हणजे वाट ठाऊक असणारा आहे आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन, जसे जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेले जाते.
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
हे मायासागरा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असणार, हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा, या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ सिद्ध झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो. पाणी कोणत्याही वस्तूला उत् म्हणजे वर धारण करते (वर ढकलते) त्याला उद्धरण म्हणतात. त्यामुळे वस्तूचे वजन पाण्यात कमी वाटते. हा उद्धरण शक्तीचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद्धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी तुझ्या उद्धरण शक्तीवर अधिक विश्वासलो. इथे अडकवून चांगला उद्धार केलास बरं ! मला दोष आणि अहंकार यांच्या कैदेत तू घेऊन आलास, मी तुझ्यावर विश्वास ठेवला; पण गुरुचरणांपासून दुरावलो अन् माझ्या गुरूंच्या समष्टी रूपापासून दुरावलो.
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला ॥ १ ॥
‘लवकर येईन’ असे सांगून माझ्या गुरुमाऊलीला मी वचन दिले, तिला सोडले आणि तिच्यापासून लांब आलो अन् मायेवर विश्वास ठेवला (गुरुचरणाचा किनारा सोडला); पण आता ते जमेल कि नाही कुणास ठाऊक ? म्हणून प्राण तळमळतो आहे. गुरुदेव मला चरणाशी घ्या…
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
पोपट पिंजर्यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा मी या दोष आणि अहंच्या पाशात सापडलो अन् फसलो आहे. अनेक हिंदु अहंकारापायी विभागले जात आहेत, हिंदुत्वाच्या पुढे मानापमान महत्त्वाचा झाला आहे. असे का ? आम्ही सर्व या दोष अहंकाराच्या पाशात फसत चाललो आहोत, माझ्या गुरुचरणांचा विरह मी कसा सहन करू ? माझी मातृभूमी हिंदु राष्ट्राची वाट पहाते आहे. आता मी प्रयत्न कसा करू ? दहा दिशा तमोमय म्हणजे अंधःकारमय झाल्या आहेत, मार्ग दिसत नाही, असे झाले आहे. दोष-अहंच्या अंध:काराने माझे मन आणि असंख्य आघातांनी माझा स्वधर्म अन् स्वराष्ट्र अंध:कारमय होईल का ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मी या मायासागरात राहून भवसागर गाठण्याचा प्रयत्न केला, का तर माझ्या मातृभूमीला माझ्या गुुरुमाऊलीला त्या प्रयत्नांचा सुगंध यावा; पण माझा हा प्रयत्न अपयशी ठरला. या मायासागरात मी अहंच्या गर्तेत अडकलो आहे. त्यामध्ये बुद्धीला कितीही पटत असले, तरी असलेले हे मायासागरातील ज्ञान आणि त्याचा भार व्यर्थ आहे, त्याला ज्ञानगुरूंच्या चरणस्पर्शाची आवश्यकता आहे.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला ॥ २ ॥
मला काय आठवते ? तर माझ्या देशातील, म्हणजे माझ्या मातृभूमीच्या, माझ्या गुरुमाऊलींच्या चरणांनी दिलेल्या शिकवणीतील त्यांच्या गुरुकुलातील आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुंदर वेली आणि तेथील छोटा पण सुगंधी गुलाब; पण इथे मायासागरात मोठ्या गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना गुरुगृहातील माणसांप्रमाणे ती वत्सलता नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता आणि प्रेम इथे नाही. इथे आहे फक्त अन्याय, भ्रष्टाचार, अत्याचार आणि सर्वांत मोठा तो अहंकार जो आम्हाला असंघटित करतो, हे मला नको आहे. ही माझी मातृभूमी नाही, तिला कलंकित केले आहे नराधमांनी ! त्यामुळे माझा प्राण तळमळतो आहे, कधी त्या मायभूमीला हिंदु राष्ट्र म्हणून स्थापित करतो.
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
हे मायासागरा, नभी अनेक नक्षत्रे अनेक जरी असतील, तरी माझ्या गुरुगृहाचा ताराच म्हणजे माझ्या गुरूंचे चरणच, माझी मातृभूमीच, संपूर्ण विश्वात तेजोमय असणारा भरतभूमीचा ताराच मला अधिक प्रिय आहे. मला मायेतीला हा भव्य महाल नको, मला पद नको, मला मानसन्मान नको, तो मला एक प्रकारे भारच आहे. मला माझ्या आईची म्हणजे गुरुमाऊलीची दिलेली छोटीशी झोपडीही चालेल. मला काहीच नको. मला माझ्या गुरूंचे केवळ चरण हवेत, राज्य तर मला नकोच आहे; पण वनवास मिळाला, तर तोसुद्धा तिच्याच वनातला हवा आहे. मला गुरूंच्या आणि गुरुचरणांच्या बंधनात रहायचे आहे, मला राष्ट्र-धर्मसेवेच्या अखंड बंधनात रहायचे आहे; पण एखाद्या वेळेस ही माया, हा अहंकार इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे. माझा प्राण गुरुचरणांशी जाण्यास तळमळतो आहे.
भुलविंणे व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला ॥ ३ ॥
हे मायासागरा, तू सरित्पते सारखा आहेस, सरित्पते म्हणजे सरितांचा पती इथे मी तुला असंख्य माया जिथे सामावल्या आहेत, अधर्म जिथे येऊन मिळतो त्या संकटसरितांचा तू पती म्हणून संबोधतो आहे. तू एकदा विचार कर की, तू सागर आहेस, सरिता (नद्या) सागराला स्वतःचे सर्व समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते, तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. हे मायासागरा, म्हणून मी तुला सांगतो आहे की, माझे ज्यांच्यावर प्रेम आहे त्या गुरुमाऊलीचा, मातृभूमीचा, भारतामातेचा मला विरह घडवशील, तर हे मायासागरा तुझे ज्यांच्यावर प्रेम आहे, त्या सरितांचा तुला विरह होईल, अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत, तर मग प्राण तळमळणे म्हणजे काय असते ? हे तुलाही कळेल. माझा प्राण तळमळतो आहे माझ्या गुरुचरणी जाण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी !
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी । मज विवासनातें देशी
हे मायासागरा यानंतर आता मी तुला शेवटचे सांगतो आहे; पण ही दीनवाणी नाही, तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो, तसे हे मागणे नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. मायासागराला संकटसरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय मायासागर हसतो आहे, मी आव्हान दिल्यावर खलपुरुष हसतात, तसाच तू हसत आहेस.
माझ्या गुरुमाऊलीला, मातृभूमीला तू जे वचन दिले होतेस की, मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतो कसा ? तुझ्यावर स्वामित्व गाजवणार्या आंग्लभूमीचा म्हणजे मायेचा, दोष आणि अहंरूपी दानवांच्या भूमीचा तू खरे तर गुलाम आहे. तिला भिऊन रहाणार्या मायासागरा, मायेच्या नगरीचा विजनवास विदेशवास किंवा विवास तू मला देतो आहेस.
तरि आंम्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला ॥ ४ ॥
पण अरे, माझी भारतभूमी, ही मातृभूमी अबला नाही, हे तुला एक दिवस कळेल. तो दिवस जवळ आला आहे. पूर्वीचा अगस्ति ऋषींचा प्रसंग तू विसरला आहेस. अगस्ति ऋषींनी पूर्वी तुझ्यावर क्रुद्ध होऊन ते एकाच आचमनात तुझे सगळे पाणी प्यायले होते. तुझी कुठे नामोनिशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्यांनी तुला सोडलं. अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
स्वातंत्र्यविरांनी सांगितले होते,
याल तर समवेत, न याल तर तुम्हाला वगळून अन् आडवे याल, तर तुम्हाला तुडवून मी माझा मार्ग आक्रमणारच ! आम्हीही मायासागराला न भीता येतील त्यांना समवेत घेऊन या मातृभूमीला हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी मायेची तमा न बाळगता, असंख्य दोष आणि अहंकार यांना पायाशी तुडवून हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग आक्रमू ही भूमी राजश्रीला विराजित सकल सौभाग्य संपन्न आहे, शौर्यवान, पराक्रमी अन् गौरवशाली आहे. या मातृभूमीला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी माझ्यातील अहंकाराचे उच्चाटन होऊन मी मातृभूमीला, माझ्या गुरूंच्या समष्टी रूपाला, गुरुचरणाला समर्पित होणे, हे अत्यावश्यक आहेच.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आदर्शाने हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रयत्न करणे आवश्यक !
आज प्रत्येक हिंदु युवकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आदर्शाने हिंदु राष्ट्र संघटक होण्यास प्रयत्न करणे, हीच त्या क्रांतीसूर्यास खरी मानवंदना ठरेल. यासाठी केवळ संघटन करणे नाही, तर त्यामागे ईश्वरी अधिष्ठान निर्माण होण्यासाठी साधना करणे, आपल्यातील अहंकाराला नष्ट करणे, ही काळाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यविरांनी अष्टभुजादेवीच्या समोर ‘शत्रुला मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेऊन त्यावर मार्गक्रमण केले. आम्हीही आज ईश्वराला साक्षी मानून या स्वातंत्र्यविराच्या स्मृतीदिनाला शपथबद्ध होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मायासागराची तमा न बाळगता स्वतःचे सर्वस्व मातृभूमीच्या चरणी समर्पित केले. कुणाचीही तमा न बाळगता त्यांनी भारतमातेलाच सर्वस्व समजून त्यासाठी संघर्ष केला. आज आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची वेळ आता आली आहे.
हिंदु युवकांनी प्रथम स्वतःमध्ये हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी प्रयत्न करावा !
भारतात हिंदु राष्ट्र स्थापित करण्याआधी प्रत्येक हिंदु युवकाने सर्वप्रथम आपल्यातील हृदयाला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. अहंकाराच्या आणि असंख्य दोषांच्या गुलामगिरीत असलेल्या हृदयाला मुक्त करून त्यात हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. हिंदु राष्ट्राशी एकरूप होण्यासाठी स्वातंत्र्यविरांच्या एका कवितेने या लेखाचा समारोप मी करतो. ती वाचून तुमच्या हृदयातील हिंदु राष्ट्र भाव जागृत होऊन शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा संगम घडो अन् भारतभूमीला हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने हाती हिंदुत्वाची मशाल घेवो, अशी गुरुचरणी प्रार्थना !
माझे अवघे मी पण हिंदु । आयुष्याचा कण कण हिंदु ॥
हृदयामधले स्पंदन हिंदू । तन-मन हिंदू, जीवन हिंदू ॥
दरीदरीतील यारे हिंदू । आकाशातील तारे हिंदू ॥
इथली जमीन, माती हिंदू । सागर, सरिता गाती हिंदू ॥
धगधगणारी मशाल हिंदु । आकाशाहून विशाल हिंदू ॥
सागरापरी अफाट हिंदू । हिमालयाहून विराट हिंदू ॥
इथला हर एक मानव हिंदू । अवघी जनता अभिनव हिंदू ॥
झंझावाती वादळ हिंदू । हिंदू हिंदू केवळ हिंदू ॥
शंभर कोटी हृदये हिंदु । सहस्रो कोटी स्वप्ने हिंदू ॥
असंख्य, अगणित, ज्वलंत हिंदू ।
अखंड भारत, अनंद हिंदू ॥
अखंड भारत, अनंद हिंदू ॥
अखंड भारत. अनंद हिंदू ॥
जयतु जयतु हिन्दूराष्ट्रम् !
हिंदुस्थानाचे क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो !
भारतमातेचा विजय असो !
– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२५.०२.२०२१)