परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १६ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया. 

भाग ९

भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459648.html


परात्पर गुरु डॉ. आठवले

५. व्यष्टी साधना

५ अ. आरंभी रज-तम गुणांना नष्ट करण्यात साधना व्यय (खर्च) होत असल्यामुळे साधनेसंबंधी प्रयत्न सतत होत नाहीत !

श्री. निलय पाठक : जसे सर्वांनी सांगितले, तसे व्यष्टी साधनेचे प्रयत्न काही दिवस नियमित होतात. त्यानंतर पुन्हा दुर्लक्ष होते. माझी साधनेची तळमळ अल्प पडते.

परात्पर गुरु डॉक्टर : सर्वांचे असेच होत असते. एक उदाहरण खाण्याचे घेऊ या. आपल्यामध्ये सत्त्व-रज-तम हे तीन गुण असतात. सत्त्वगुण अधिक असेल, तर प्रतिदिन जसे आपण भोजन करतो, तेवढेच खाऊ. जेव्हा रजोगुण वाढतो, तेव्हा काय होते ? आपल्याला अधिक भूक लागते आणि तमोगुण वाढलेला असतो, तेव्हा ‘आज मला भूक नाही. आज मी जेवणार नाही’, असे होते. रज-तम गुणांच्या पुढे जाऊन आपल्याला स्वतःमध्ये सत्त्वगुण प्रस्थापित करायचा आहे. असे केल्याने नेहमी सारखी भूक लागते आणि  साधना चालू रहाते. लवकर लवकर पुढे जायचे असते; परंतु आरंभीची साधना रज आणि तम नष्ट करण्यासाठी खर्च होत असते.

५ आ. काही कारणामुळे ‘उद्या प्रयत्न करीन’, असे वाटले, तर त्याच दिवशी प्रयत्न करा !

श्री. वसंत सणस : व्यष्टी साधनेच्या संदर्भात आज प्रयत्न झाले नाहीत, तर रात्री झोपतांना ‘उद्या मी चांगले प्रयत्न करीन’, असा विचार करतो; परंतु…

परात्पर गुरु डॉक्टर : नाही. याच्या उलट करायचे असते. व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्यवस्थित झाले नाहीत, तर शिक्षापद्धत अवलंबावी, तुमच्या ‘उद्या करीन’, याला ‘स्वतःला शिक्षापद्धत वापरली’, असे म्हणत नाहीत. ‘जोपर्यंत आजचे सत्र करत नाही, तोपर्यंत मी झोपणार नाही. पुष्कळ झोप आली, तर मी चालत चालत स्वयंसूचनेचे सत्र करीन; कारण अंथरूणावर पडलो, तर झोप लागते’, असा विचार करावा. त्या त्या दिवशीच स्वयंसूचनांची सत्रे पूर्ण करायची आहेत. उद्या कधीही येत नाही. आजचे जेवण आपण उद्या करतो का ? त्याच दिवशी जेवतो ना ? तसेच हे आहे.

५ इ. ‘अखंड सेवा व्हावी’, असे वाटणे, ही तळमळ आहे आणि साधनेच्या व्यतिरिक्त विचार येत असतील, तर योग्य कृती होण्यासाठी स्वयंसूचना द्या !

श्री. वसंत सणस : मला पूर्णवेळ साधक होऊन एक वर्ष झाले. त्यामुळे मुंबईहून गोव्याला कायमस्वरूपी रहायला आलो आहे; परंतु जे व्यावहारिक काम आहे, ते अजून बाकी आहे. त्यात वेळ जातो. म्हणजे गोरखपूरवरून (जेथे सेवा करत आहे, तेथून) मास दोन मासांनी येथे व्यावहारिक कामांसाठी मला गोव्याला यावे लागते. त्यामुळे मनात ‘ते काम केव्हा पूर्ण होणार’, असे पुष्कळ विचार असतात.

परात्पर गुरु डॉक्टर : हे चांगले आहे. ही साधनेची तळमळ आहे.

श्री. वसंत सणस : कधी कधी या विचारांमध्ये अधिक वेळ जातो.

परात्पर गुरु डॉक्टर : विचार करून उत्तर मिळणार आहे का ? जी कृती करायची आहे, त्याचाच विचार करायचा आणि तोही त्याच वेळी करायचा. बाकीचा वेळ सेवा, समष्टी (समाजात अध्यात्मप्रसारासाठी) सेवा आणि नामजप यालाच द्यायचा. विचार चालू राहिले, तर त्याविषयी स्वयंसूचना द्या की, ‘आता विचार करून माझे प्रश्‍न सुटणार नाहीत.’ जे प्रायोगिक स्तरावर करायचे आहे, त्याविषयी स्वयंसूचना द्यायची.

५ ई. ‘विविध सेवा करायला शिकाव्यात’, असे वाटत असेल, तर शिकण्याला निश्‍चित प्राधान्य द्यावे !

श्री. वसंत सणस : माझ्या स्वतःविषयी पुष्कळ अपेक्षा असतात. म्हणजे ‘मला ही सेवा करता आली पाहिजे, मला ती सेवासुद्धा करता आली पाहिजे’, असे विचार माझ्या मनात असतात.

परात्पर गुरु डॉक्टर : हे चांगले आहे. यालाच ‘तळमळ’ म्हणतात. सर्व करायला का जमले पाहिजे, तर ईश्‍वर सर्वकाही करू शकतो. जर मी एकच विभाग सांभाळला, तर मी ईश्‍वराशी एकरूप होऊ शकेन का ? हा तुमचा गुण आहे. केवळ विचार येतो आणि कृती करत नाही, तर मात्र चुकीचे झाले. प्राधान्य सुनिश्‍चित करायचे आणि विचार करायचा की, ‘आधी काय करता यायला पाहिजे ? दुसरे काय, तिसरे काय ?’ असे टप्प्याटप्प्याने शिकायचे. एकाच वेळी सगळे येऊ शकत नाही. जी सेवा शिकून घ्यायला सोपी आहे, ती प्रथम करायची. नंतर दुसरी, त्यानंतर तिसरी अशी प्रत्यक्ष कृती करत जायचे.

(क्रमश:)   

भाग १०. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459997.html