प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १५ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ८)
भाग ७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459117.html
४. नामजप साधना
४ अ. व्यवसायामुळे साधना होत नसेल, तर नामजप करा !
श्री. यश खत्री : ‘मी दुकानात जातो किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जातो, तेव्हा माझी काहीच साधना होत नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : त्या वेळी नामजप करू शकता ना ? नामजप केला, तरी पुरे झाले. स्नान करतांना, दुकानात जातांना, भोजन करतांना आणि अन्य कोणत्याही कृती करतांना नामजप करायचा. असे करत राहिलात, तर काही मासानंतर नामजपातून आनंद मिळू लागतो. त्यामुळे नामजप साधना चालू रहाते. चिंता करू नका, हे करत रहा.
४ आ. सकाळी झोपेतून जागे झाल्यावर अनिष्ट शक्तीचा त्रास होत असेल, तर रात्री झोपतांना हळू आवाजात नामजप लावून ठेवा !
कु. नागमणी आचार : सकाळी मला स्वप्न पडते. ते पुष्कळ त्रासदायक असते आणि उठल्यानंतर त्या दिवशी तसेच होते. असे ७ दिवस झाले. ‘आपल्या कृपेमुळे आता आपला ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उपलब्ध आहे. तो जवळ ठेवल्यावर त्रास अल्प झाला.
परात्पर गुरु डॉक्टर : सकाळी उठल्यावर त्रास होतो, म्हणजे अनिष्ट शक्ती रात्री सूक्ष्मातून आक्रमण करतात. त्यापासून वाचण्यासाठी भ्रमणभाषमध्ये जो नामजप असेल, तो रात्रभर चालू ठेवायचा. नामजपामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती अनिष्ट शक्तीला रोखेल. उदबत्ती लावून झोपलात आणि मध्येच जाग आली, तर पुन्हा दुसरी उदबत्ती लावावी.
कु. नागमणी आचार : म्हणजे मला जी स्वप्ने पडतात, ‘ती मानसिक स्तरावरची आहेत’, असे विचार मनात येतात.
परात्पर गुरु डॉक्टर : हो; परंतु रात्री नामजपादी उपाय चालू केल्यावर स्वप्ने पडणारच नाहीत. झोपतांना अंथरुणाच्या बाजूला रिकामे खोके लावा, नामजप लावा आणि उदबत्तीचे उपायसुद्धा करायचे. पंचतत्त्वांचे उपाय चालू राहिले, तर सकाळी समस्या असणार नाही. प्रत्यक्ष करून बघा. रामनाथी आश्रमात झोपल्यावर असे होते का ?
कु. नागमणी आचार : येथे तसे त्रास होत नाहीत.
परात्पर गुरु डॉक्टर : मग ही गोष्ट सिद्ध झाली. घरातील वातावरण रामनाथी आश्रमासारखे सात्त्विक केले, तर काही त्रास होणार नाही. काही दिवस यंत्रावर नामजप लावले की, स्वतःचा नामजप चालू होऊन जाईल. आपल्या मनामध्ये सतत नामजप असेल, तर दुसरा विचार कुठून येणार ?
४ इ. कुंडलिनी जागृतीमुळे बसून नामजप करतांना शरीर हलते !
कु. मनीषा माहुर : कधी-कधी बसून नामजप करते किंवा स्वयंसूचनेचे सत्र करते, तेव्हा मला ‘माझे शरीर हलत आहे’, असे वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर : ही चांगली अनुभूती आहे. मूलाधार चक्रामध्ये निद्रिस्त असलेली कुंडलिनी जागृत होऊ लागली की, खालून वर हळूहळू येऊ लागते. तेव्हा शरीर हलण्याचा अनुभव येतो. हे साधनेतील प्रगतीचे लक्षण आहे. पुढे पुढे शरीर हलत नाही आणि नंतर मन आनंदावस्थेत रहाते.
४ ई. रामनाथी आश्रमात असलेल्या चैतन्यामुळे इथे नामजप करतांना ध्यान लागते !
कु. मनीषा माहुर : परात्पर गुरुदेव, ‘नामजप करतांना शरीर हलते’, हे मला मी सनातनच्या देहली सेवाकेंद्रात होते, तेव्हा जाणवत होते. मी येथे (रामनाथी आश्रमात) आल्यावर तसे काही जाणवत नाही. स्वयंसूचना सत्र करतांनासुद्धा तसे जाणवत नाही. साधना शिबिरात मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही सभागृहात बसून क्षमायाचना करत होतो. त्या वेळी डोळे उघडल्यानंतर शरीर हलत असल्याचे लक्षात आले.
परात्पर गुरु डॉक्टर : पुष्कळ चांगले आहे. हेच वास्तूचे महत्त्व आहे ना ! रामनाथी आश्रमात चैतन्य असल्यामुळे अशी अनुभती येते. आपल्याला केवळ आपले घर नव्हे, केवळ भारतच नव्हे, तर पृथ्वीवरील सर्व ठिकाणे चैतन्यमय बनवायची आहेत.
(क्रमश:)
भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459876.html
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |