उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात. उन्हाळ्यात जलाशय आटून पाणी दूषित होते. त्यामुळे ढाळ होणे (डायारिया, डिसेंटरी), उलट्या होणे (गॅस्ट्रोे), विषमज्वर (टायफॉइड), कावीळ इत्यादी विकारही होऊ शकतात. उन्हाळ्यातील या विकारांपासून आपले रक्षण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे यांसाठी पुढील काळजी घ्यावी.

वैद्य मेघराज पराडकर

१. ‘सकाळी दात घासल्यावर गाईच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला ‘नस्य’ असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचे, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ खाणे टाळावे.

३. शीतपेये (कोल्डड्रिंक्स), आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद रस यांचे सेवन करू नये. हे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात. यांच्या अतीसेवनामुळे रक्तधातू दूषित होऊन त्वचारोग होतात.

४. कैरी उकडून बनवलेले गोड पन्हे, पाण्यात लिंबाचा रस आणि साखर घालून बनवलेले सरबत, जिर्‍याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदुळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड आणि द्रव पदार्थांपैकी जे शक्य आणि उपलब्ध होईल ते आहारात असावे. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरिराचे रक्षण होण्यास साहाय्य होते.

५. या दिवसांत तहान खूप लागत असल्यामुळे तहान भागेल एवढे पाणी प्यावे.

६. या ऋतूत दही खाऊ नये. त्याऐवजी साखर आणि जिरे घालून गोड ताक घेता येते.

७. या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत.

८. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. डोके आणि डोळे यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगल यांचा वापर करावा.

९. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावे.

१०. या दिवसांत शीतकपाट किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे.

११. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या समवेत ठेवाव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्‍या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे प्रतिदिन करावे. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे.

१२. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणे आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

१३. जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी.

१४. मैथुन करणे टाळावे. करायचे झाल्यास पंधरा दिवसांतून एकदा करावे.

१५. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी सूर्योदयानंतरही झोपून राहणे टाळावे.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.