मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

हरिद्वार महाकुंभ २०२१ विशेष

सौ. प्रीती जाखोटिया

मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्‍या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत. ‘हरि’पर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवणारी देवी गंगा जिथे अवतरली, अशा हरिद्वार नगरीत वर्ष २०२१ चा महाकुंभमेळा भरला आहे. महाशिवरात्रीच्या विशेष दिवशी प्रथम पवित्र स्नानाने कुंभमेळ्यास आरंभ झाला आहे. यानिमित्ताने…

१. शैव-वैष्णवांचे तीर्थ !

हिंदु एकतेचे असीम दर्शन घडवत प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा विश्‍वातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्यावर हरिद्वार येथे कुंभपर्व आयोजित होतो. गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा यांसारख्या धार्मिक कृतींसाठी कोट्यवधी हिंदू कुंभमेळ्याला येतात.

उत्तराखंड राज्यात गंगानदीच्या किनार्‍यावर वसलेली प्राचीन नगरी हरिद्वार येथे गंगा नदी डोंगर-पर्वतावरून येणार्‍या वेगवान प्रवाहाची गती मैदानी प्रदेशात आल्यावर कमी होऊ लागते. गंगेला धारण केलेल्या भगवान शिवाने याच ठिकाणी तिला पृथ्वीवर सोडल्यामुळे हे शैव क्षेत्र मानले जाते, तर गंगाद्वाराजवळील एका शिळेवर श्रीविष्णूचे पदचिन्ह असल्याने वैष्णवांसाठीही हे क्षेत्र महत्त्वाचे आहे.

गङ्गाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते ।
तथा कनखले स्नात्वा धूतपाप्मा दिवं व्रजेत् ॥

– महाभारत, पर्व १३, अध्याय ६४, श्‍लोक १३

महाभारताच्या ६४ व्या अध्यायात गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल या तीर्थांमध्ये स्नान करणार्‍या व्यक्तीची पापे धुतली जातात अन् त्याला स्वर्गलोकात स्थान प्राप्त होते, असा उल्लेख येतो.

२. हरिद्वारमधील अन्य धार्मिक स्थाने

हरिद्वारमध्ये देवनदी गंगेप्रमाणे विशेष स्थाने आहेत, ज्यांना पौराणिक महत्त्व आहे.

२ अ. ब्रह्मकुंड : येथे राजा भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले. त्यानंतर एका राजाने तपश्‍चर्या करून ब्रह्मदेवाला या ठिकाणी रहाण्याचा आशीर्वाद मागितला आणि ब्रह्मदेवांनी येथे निवास केला. या स्थानाला राजाने ‘ब्रह्मकुंड’ हे नाव दिले. या कुंडात गंगेचा एक अखंड प्रवाह पडत असतो.

२ आ. हरि की पौडी : ब्रह्मकुंडच्या जवळ ‘हरि की पौडी’ हे स्थान आहे. येथे गंगेचे मंदिर असून तेथे सायंकाळी गंगाआरती होते आणि भाविक गंगा नदीच्या प्रवाहात दिवे सोडतात. सायंकाळचे हे दृश्य अत्यंत मंगलमय असते.

२ इ. कुशावर्त : हे तीर्थही ब्रह्मकुंडाजवळ आहे. येथे श्राद्धविधी केले जातात. मेष संक्रांतीला येथे भाविक विशेषतः उपस्थित रहातात.

२ ई. मायापुरी : पुराणांमध्ये सांगितलेल्या सात मोक्षदायी नगरींमध्ये ‘मायापुरी’ सांगितली आहे. ते हेच मायाक्षेत्र आहे. हरि की पौडी घाटापासून एक मैल अंतरावर मायादेवीचे एक मंदिर आहे. दक्ष राजाने सतीचा अपमान केला. त्यामुळे भगवान शंकराने त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. तेव्हा दक्ष राजा शिवाला शरण गेला. ‘ही पूर्ण घटना परमेश्‍वराच्या मायेमुळे झाली, म्हणून ही यज्ञभूमी ‘मायाक्षेत्र’ या नावाने प्रसिद्ध होईल’, असा वर शिवाने दक्ष राजाला दिला.

२ उ. कनखल : दक्ष राजाने केलेल्या प्रार्थनेमुळे भगवान शिवाने येथे एक शिवलिंग स्थापन केले, जे ‘दक्षेश्‍वर’ नावाने प्रसिद्ध आहे. जिथे सतीने आत्मदहन केले होते, ते ‘सतीकुंड’ही येथे आहे.

२ ऊ. बिल्वकेश्‍वर : कुशावर्तापासून काही अंतरावर बेलवृक्षांच्या वनात बिल्वकेश्‍वर शिवाचे स्वयंभू लिंग आहे. येथील शिवलिंगावर बिल्बपत्र अर्पण करणे, हे अत्यंत पुण्यकारक असते.

या समवेतच नीलपर्वत, कपिलस्थान, भीमगोडा, सप्तर्षि मंदिर, श्रवणनाथ अशी धार्मिक स्थळेही येथे आहेत.

– सौ. प्रीती आनंद जाखोटिया, देहली.