MNS Chief Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पवित्र गंगास्नानाचा अवमान !

पुणे – गंगा नदी स्वच्छ होणार, हे मी राजीव गांधी यांच्या वेळेपासून ऐकत आलो आहे. आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी माझ्यासाठी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी आणले होते. मी त्यांना म्हटले, ‘‘मी ते पिणार नाही.’’ त्या नदीत कितीतरी जण आंघोळ करत होते. असे पाणी कसे प्यायचे ? देशातील एकही नदी स्वच्छ नाही. अशी स्थिती आहे आणि आपण नदीला माता मानतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील भेद जाणा, असे असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. येथे मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. गंगा नदीचा अवमान करण्यावरून राज ठाकरे यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.

गंगेची परीक्षा करू नये ! – आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज, नाशिक

आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज

तीर्थांची किंवा गंगेची परीक्षा करू नये. गंगा नदीविषयी अशी वेडीवाकडी टीका करून स्वतः पुरोगामी असल्याचे दाखवणे चुकीचे आहे.

गंगास्नान करणे ही अंधश्रद्धा नाही ! – आमदार गिरीश महाजन, भाजप

आमदार गिरीश महाजन

कुंभमेळ्यात गंगास्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धाच आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. त्याला धार्मिक अधिष्ठान आहे.

राज ठाकरे यांच्याकडून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान ! – प्रवीण दरेकर, भाजप

श्री. प्रवीण दरेकर

राज ठाकरे यांचे वक्तव्य हे भाविकांचा अपमान करणारे आहे. हिंदु माणूस देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही आपण देव मानतो. त्यामुळे दुसर्‍यांच्या श्रद्धेचा अपमान करू नये.

प्रत्येकाच्या श्रद्धेचा सन्मान करायला हवा !- आमदार राम कदम, भाजप

श्री. राम कदम

आरोप करण्याआधी राज ठाकरे यांनी विचार करावा. घरी बसून असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा सन्मान करायला हवा.

संपादकीय भूमिका

गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !