|
नवी देहली – प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभपर्वाच्या वेळी नद्यांचे पाणी स्नान करण्यायोग्यच होते, असे निरीक्षण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला कळवले आहे. याआधीच्या अहवालात मंडळाने गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्यात मानवी विष्ठेतील जिवाणू उच्च प्रमाणात आढळल्याचे नमूद केले होते; परंतु सांख्यिकी विश्लेषणानुसार संगमाचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते, असे नवीन अहवालातून सांगण्यात आले आहे.
नद्यांच्या पाण्यांच्या नमुन्यांमध्ये विविधता असल्यामुळे सांख्यिकी विश्लेषण करण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे. पाण्यांचे नमुने वेगवेगळ्या दिनांकांना समान स्थानांवरून आणि एकाच दिवशी विविध स्थानांवरून अशा भिन्न पद्धतींनी घेण्यात आले होते. त्यामुळे त्यामध्ये नदीच्या पाण्याची एकूण गुणवत्ता प्रतिबंबित झाली नव्हती, असा दावा नवीन अहवालात करण्यात आला आहे. मंडळाने हा अहवाल २८ फेब्रुवारी या दिवशी सिद्ध केला आहे.
‘जर्मन शेफर्ड’ या नावाने ओळखल्या जाणार्या ध्रुव राठी या यूट्यूबरने (यूट्यूब वाहिनी चालवणार्या व्यक्तीने) महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या कालावधीत ‘संगमस्नानातील पाणी अत्यंत हानीकारक’ (धिस इज टॉक्सिक) अशा आशयाचा व्हिडिओ बनवला होता. याद्वारे स्नानासाठीचे पाणी अत्यंत खराब असल्याचे सांगत राठी याने हिंदूंना मूर्खात काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा या व्हिडिओ १० दिवसांत १ कोटी ३० लाख लोकांनी पाहिला होता.
संपादकीय भूमिकाकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधीच्या अहवालाचे भांडवल करून ध्रुव राठी आदी कट्टर हिंदुद्वेष्ट्या मंडळींनी महाकुंभपर्वातील व्यवस्था कुचकामी आणि जनताद्रोही असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. आता या संपूर्ण कंपूने प्रदूषण नियंत्रण मंडळ भाजपधार्जिणे झाल्याचे म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको; परंतु आधी केलेल्या टीकेतून हिंदूंची श्रद्धा पायदळी तुडवण्याचे महापाप करणार्या हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे ! |