‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ची नुकतीच सांगता झाली आहे. ६५ कोटींहून अधिक हिंदूंनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि गंगास्नानाचा लाभ घेतला. या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लक्षात आलेली काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
१. नियोजन, मागणी आणि उत्पन्न
हा महाकुंभ कोणत्या नियोजन आणि मागणीच्या आधारावर आयोजित करण्यात आला होता, हे लक्षात यावे, यासाठी ही माहिती पुन्हा देत आहे. तब्बल ६५ कोटींहून अधिक लोक महाकुंभामध्ये पोचले. ४ सहस्र हेक्टर क्षेत्रात पसरलेली आणि तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली महाकुंभनगरी जगाच्या सर्वांत मोठ्या स्टेडियमहून १६० पट मोठी होती, ज्यात ४ लाखांपेक्षा अधिक तंबू आणि दीड लाख शौचालये उभारण्यात आली होती. १३ सहस्र ८३० रेल्वेच्या फेर्यांमधून ३० कोटी २ लाख भाविक आणि २ सहस्र ८०० हून अधिक विमाने प्रयागराजला पोचली. चारचाकी वाहने आणि बसेस यांची संख्या लवकरच समजेल. ५० सहस्र सुरक्षा कर्मचारी आणि २ सहस्र ७०० कॅमेरे यांद्वारे महाकुंभाची सुरक्षाव्यवस्था पहाण्यात आली. महाकुंभमेळा क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात ४३ रुग्णालये उभारण्यात आली होती, ज्यामध्ये ६ लाख लोकांवर उपचार करण्यात आले. महाकुंभमध्ये स्वच्छता राखण्यासाठी ४ लाख कचर्याचे डबे लागले आणि ११ सहस्र स्वच्छता कर्मचार्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळ्यामुळे उत्तरप्रदेशच्या सकल उत्पादनामध्ये तब्बल ३ लाख कोटी रुपयांची भर पडली !
२. स्थानिक नागरिकांना आलेल्या अडचणी आणि त्यांनी आनंदाने अतिथींचे केलेले स्वागत
कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रयागराजच्या लोकांना वाहतूक आणि गर्दी यांमुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. संपूर्ण दीड मास शहरातील सर्व रस्ते २४ घंटे भरलेले होते, अगदी अरुंद गल्ल्याही खचाखच भरलेल्या होत्या. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर पूर्णपणे ठप्पच होती. दुचाकीस्वार आणि ई-रिक्शाचालक जिथून मिळेल तेथून गाड्या घुसवत होते. अशी ही धामधूम प्रयागराजमध्ये ६ ते ७ आठवडे चालू होती. स्थानिक लोक शक्य तेवढे घराबाहेर पडणे टाळत होते. केवळ वाहतूक आणि गर्दी नव्हे, तर महाकुंभामुळे प्रयागराजमधील स्थानिक जनजीवन अस्थिर झालेले होते. दैनंदिन व्यवहारांवर प्रचंड ताण पडला होता. ज्यांची सोय होती, अशा अनेक रहिवाशांनी प्रयागराजच्या बाहेर तात्पुरते स्थलांतरही केले होते. बाहेरून आलेले सगळेच भाविक काही एकसारखे नव्हते. कितीही वेळा साफसफाई केली, तरी वाटेल तिथे कचरा टाकणे, थुंकणे आणि कोणत्याही कोपर्यात लघवी करणारेही होते. नागरी भावनांचा अभाव प्रकर्षाने दिसत होताच ! (हे महासत्ता होऊ पहाणार्या भारताला लज्जास्पद ! स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनेतला नैतिकतेचे शिक्षण न दिल्याचा परिणामच म्हणावा लागेल ! – संपादक) शहराची पायाभूत सुविधा एवढ्या लोकसंख्येला कधीच हाताळू शकणार नव्हती. या काळातील बहुतांश दिवस अनेक कार्यालये, शाळा, महाविद्यालये एवढेच नव्हे, तर काही दिवस प्रयागराज उच्च न्यायालय आणि प्रयागराज संगम रेल्वेस्थानकही बंद ठेवण्यात आले होते.
महाकुंभासाठी आलेल्या भाविकांच्या अद्वितीय गर्दीमुळे प्रयागराजमध्ये औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता, जो स्थानिक जनतेसाठी फार चिंताजनक होता. प्रयागराज येथील ‘लीडर रोड’च्या घाऊक औषधी बाजारातील व्यवहार कुंभ चालू झाल्यावर २ ते ३ दिवसांतच जानेवारीच्या मध्यापासून विस्कळीत झाला ! पुरवठा साखळी खंडित झाली. आपत्कालीन सेवेच्या ट्रकना प्रवेशबंदी नव्हती; पण वाहतूक जाम झाल्यामुळे ट्रक येणे अवघड झाले होते. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला, ज्यामुळे मूलभूत अशा रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह यांसाठी आवश्यक औषधांचाही तुटवडा निर्माण झाला.
अशा अनेक अडचणींना तोंड देत असतांनाही प्रयागराजच्या लोकांनी प्रचंड संयम ठेवला. कोणतीही तक्रार केली नाही. हाणामारी, आंदोलने किंवा उद्रेक झाला नाही. स्वतः त्रास सहन केले; पण बाहेरून आलेल्या कोणत्याही भाविकाला अडचण होऊ नये, याची त्यांनी काळजी घेतली. कुणी स्थानिकाने प्रत्यक्षात असो किंवा सामाजिक माध्यमांवर स्वतःचा ताणतणाव व्यक्त केला नाही. उलट बाहेरून आलेल्या लोकांचे हसतमुखाने स्वागतच केले. आलेल्या लोकांच्या आनंदात त्यांनी आनंद घेतला. आता त्यांचे जनजीवन पुन्हा रूळावर यायला लागले आहे.
३. दैवी चमत्कारच !
एवढ्या मोठ्या प्रमाणात महाकुंभमेळा आयोजित होत असतांना ९९ टक्के लोक समाधानाने आणि चांगल्या आठवणी घेऊन परत आपापल्या घरी गेले. हा एक धार्मिक उत्सव होता. भाविकांची संपूर्ण १०० टक्के नव्हे, तर अधिकाधिक सोय कशी होईल, याकडे प्रशासनाचे लक्ष होते. त्यांना कार्यक्रमाच्या आयोजनाविषयीचे कोणतेही प्रमाणपत्र नको होते. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारला, म्हणजेच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला पैकीच्या पैकी मिळतात !
संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पटीहून अधिक, म्हणजे ६५ कोटींहून अधिक लोक एकाच ठिकाणी त्रिवेणी संगमावर येतात, सर्व दिशेकडून प्रयागराजला लाखो वाहने, विमाने (आणि बोटीही) पोचतात; पण या संपूर्ण काळात प्रयागराजच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक भारतातील अनेक शहरांपेक्षा चांगला रहातो, याला ‘दैवी चमत्कार’च म्हणावा लागेल ! हर हर गंगे, हर हर महादेव !
– वेद कुमार
प्रदूषण आणि पर्यावरण
प्रयागराज येथील महाकुंभनगरीत महत्त्वपूर्ण दिनांकांना ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ (एक्यूआय) पुढीलप्रमाणे होता :
मुख्य धार्मिक दिनांकांच्या वेळी चंदीगडचा ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ पुढीलप्रमाणे होता :
१०० पेक्षा न्यून ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ हा ‘चांगला’ मानला जातो, तर १० ते १५० इतका निर्देशांक ‘मध्यम’ म्हणून वर्गीकृत केला जातो. मौनी अमावास्या (जेव्हा ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ थोडासा मध्यम होता) वगळता इतर सर्व दिवशी हवेची गुणवत्ता ‘चांगली’ म्हणून वर्गीकृत केली गेली. भाविकांची सततची वर्दळ आणि इंधनावर चालणार्या असंख्य वाहनांची गर्दी असूनही शहरातील हवेची गुणवत्ता सलग ४२ दिवस ‘ग्रीन’ झोनमध्ये (पर्यावरणपूरक क्षेत्रात) राहिली ! (स्रोत : ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अधिकृत ॲप ‘समीर’ वरील जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीतील माहिती) या ४२ दिवसांतील हवेच्या गुणवत्तेच्या माहितीचे तुलनात्मक विश्लेषण करता ‘तात्पुरत्या उभारलेल्या महाकुंभनगरी’च्या हवेची गुणवत्ता ‘स्वतंत्र भारतातील सर्वांत पहिली सुनियोजित नगरी’ चंदीगडपेक्षाही चांगली असल्याचे यातून दिसून येते.
प्रयागराज येथे ६५ कोटी लोक एकत्र येऊनही हवेचा निर्देशांक चांगला असणे, हा एक दैवी चमत्कारच नव्हे का ? |