१. संतांचा मिळालेला अविस्मरणीय सत्संग !
‘एकदा मला संतांचा सत्संग मिळाला. त्या वेळी मी संतांना जे सांगितले, ते त्यांनी मला लगेच लिहून द्यायला सांगितले ते मी लिहून देत आहे. हा सत्संग अविस्मरणीय होता. मी त्यांच्याशी बोलतांना एवढी तन्मय झाले होते की, मला ‘मी कशी बोलले ? ते शब्द माझ्या मुखातून कसे बाहेर पडत होते ?’, हे काहीही आठवत नाही. मला माझे अस्तित्वही जाणवत नव्हते. माझ्याकडून सगळे अगदी सहज बोलले गेले.
२. साधिकेने तिला स्वप्नात सारखे भगवान शिव आणि शिवपिंडी दिसत असल्याचे सांगितल्यावर संतांनी तिची गेल्या जन्मांची ही साधना असल्याने तिला शिवाची उपासना करण्यास सांगणे
वर्ष २०१५ च्या जानेवारी मासामध्ये मी आणि आई पहिल्यांदा रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा मी संतांना सांगितले होते, ‘‘मला स्वप्नात सारखे भगवान शिव आणि शिवपिंडी दिसते. आतापर्यंत मी शिवाशी संबंधित काहीच उपासना केली नाही; तरीसुद्धा ‘मला हे का दिसते ?’, ते मला समजत नाही.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझी ही गेल्या जन्मांची साधना आहे. तू तीच कर. तुझ्या अंतर्मनात जे आहे, तेच तुला दिसते.’’ तेव्हा ते शब्द माझ्या मनात कोरले गेले.
३. संतांच्या आज्ञेनुसार ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करण्यास आरंभ करणे
त्या दिवसापासून मी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करण्यास आरंभ केला. त्यामुळे माझ्या भगवान शिवावरच्या भक्तीमध्ये पुष्कळ वाढ झाली. त्यामुळे मला माझ्यात जाणवलेला पालट आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
३ अ. नामजपासंदर्भात आलेली अनुभूती
३ अ १. नामजप आपोआप होऊन श्वासाशी जोडला जाणे, चालतांना चालण्याच्या गतीप्रमाणे नामजपाची गती पालटणे आणि ‘आतून कुणीतरी नामजप करत असून कानांत कुणीतरी नामजप बोलत असल्याचे जाणवणे : आता माझा नामजप आपोआप होतो. मला त्याची वेगळी आठवण करावी लागत नाही. हळूहळू माझा नामजप श्वासाशी जोडला गेला. माझा नामजप श्वास आत घेतांना ‘ॐ नमः’ आणि श्वास बाहेर सोडतांना ‘शिवाय’ असा होतो. कधी कधी मी श्वास जलद गतीने घेत असेन, तर श्वास आत घेतांना ‘नमः’ आणि श्वास बाहेर सोडतांना ‘शिवाय’ एवढाच होतो. त्यामुळे आता चालतांनासुद्धा नाम घेतले जाते. पहिले पाऊल टाकतांना ‘ॐ’, दुसरे पाऊल टाकतांना ‘नमः’ आणि तिसरे पाऊल टाकतांना ‘शिवाय’ असा नामजप माझ्या पावलांशी जोडला आहे. हळू चालतांना नामजप अल्प गतीने होतो आणि जलद गतीने चालतांना नामजप जलद गतीने होतो. माझ्या मनातील विचार बंद झाले किंवा बोलणे थांबवले, तर लगेचच नामजप चालू होतो. ‘कधी कधी आतून कुणीतरी नामजप करत आहे’, असा आवाज ऐकू येतो, तसेच ‘माझ्या कानांत कुणीतरी नामजप बोलत आहे’, असे मला वाटते.
३ अ २. झोपेतही नाम चालू रहाणे आणि मन निर्विचार होऊन नामजपाविना अन्य कुठलेच अस्तित्व नसल्याचे जाणवणे : मी जेव्हा झोपते, तेव्हा मला पुष्कळ वेळा असे वाटते, ‘झोपेत माझ्या आतमध्ये कुणीतरी नामजप करत आहे.’ झोपेत नाम चालू रहाते. मी सकाळी उठल्यावर नाम आपोआप मनात मोठ्याने येते. तेव्हा मला पुष्कळ निर्विचार वाटते. कधी कधी हा नामजप इतक्या मोठ्याने आणि मनापासून होतो. ‘केवळ ती नामजपाची ६ अक्षरेच अस्तित्वात आहेत आणि बाकी कसलेच अस्तित्व नाही’, असे मला वाटते. काही न बोलता ‘ॐ नमः शिवाय ।’ एवढेच शब्द उच्चारावेसे वाटतात. अनेकदा असेही अनुभवायला मिळाले आहे की, ‘श्वास बंद होतो आणि केवळ नामजप चालू रहातो.’ तेव्हा त्या स्थितीतून बाहेर आल्यावर जाणीव होते, ‘मी श्वास घेत नव्हते.’ असे वाटते, ‘त्या वेळी मी श्वासामुळे नाही, तर नामजपामुळे जिवंत होते आणि आता प्रत्यक्षातसुद्धा असेच आहे. नामजप थांबला, तर मी मरून जाईन’, असे वाटते. ‘माझ्या शरिरात सर्व अवयवांच्या जागी नामजप आहे’, असेच मला वाटते.
४. स्वभावात जाणवलेले पालट
४ अ. एखाद्या प्रसंगात निराशा आल्यास स्वयंसूचना दिल्यावर त्या प्रसंगाचा विसर पडणे आणि शिवाच्या विचारांमध्ये हरवून जाऊन नैराश्य दूर होणे : मला कोणत्याही प्रसंगात अधिक वेळ अडकायला होत नाही. पूर्वी व्हायचा, तसा मला मानसिक त्रासही होत नाही. एखादा प्रसंग घडला आणि मला निराशा आली की, मी तो प्रसंग लिहून काढते. त्यावर सूचना सिद्ध करून सत्र करते. मी आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करते आणि मला त्या प्रसंगाचा विसर पडतो. त्याचसमवेत मी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाते. तेव्हा मला आश्रमात वावरतांना कोणीतरी भेटून सांगतात, ‘‘स्मितल, काल मला कुणीतरी शिवाशी संबंधित संदेश (मेसेज) पाठवला. तेव्हा मला तुझी आठवण आली.’’ मी काढलेल्या शिवाच्या चित्रांच्या संबंधित चित्राची कुणीतरी आठवण करून देतात किंवा शिवाशी संबंधित कोणता तरी प्रश्न विचारतात. तेव्हा मला त्या प्रसंगाचा विसर पडतो, नैराश्य दूर होते आणि मी परत शिवाच्या विचारांमध्ये हरवते. तेव्हा असे वाटते, ‘मी शिवांना विसरले; तरी ते मला विसरले नाहीत.’ तेच मला साधकांच्या माध्यमातून त्यांची आठवण करून देतात.
४ आ. वाईट वाटत असल्यास ‘शिवाच्या विरागीपणा या गुणामधील थोडासा अंश मिळावा’, अशी प्रार्थना करणे : बर्याच वेळा असे होते की, साधक माझ्याशी बोलत नाहीत. प्रतिसाद देत नाहीत. मनमोकळेपणाने वागत नाहीत. तेव्हा पूर्वी वाईट वाटायचे. शिव तर वैरागी आहेत. कुणी त्यांच्याशी कसेही वागले, तरी त्यांना काही वाटत नाही. ते त्यांची साधना करत रहातात. आपण जर त्यांचा नामजप करतो, तर त्यांच्या ‘वैरागी’ या गुणामधील थोडासा अंश जरी मला मिळाला, तर मीपण वैरागी होईन’, असे वाटते. मग तशी त्यांना प्रार्थना होते. त्यामुळे वाईट वाटत नाही.
४ इ. स्वतःमध्ये अहं वाढल्याची जाणीव होताच ‘शिवाला ते आवडणार नाही’, हे लक्षात येणे आणि ‘अहं वाढू न देता केवळ भक्ती द्या’, अशी प्रार्थना करणे : ‘माझ्यात पुष्कळ भाव आहे. मी चांगली आहे. मी वेगळी आहे. मी सुंदर आहे. मी सेवा चांगली केली. मी पुष्कळ काही करते’, असे अहंचे विचार काही वेळा माझ्या मनात येतात. तेव्हा मला वाटते, ‘शिव माझ्यावर रागावले असतील. त्यांना अहं चालत नाही. मला अहंकार किंवा गर्व झाला, तर मला कैलासावर रहायला मिळणार नाही आणि मी त्यांच्यापासून लांब राहू शकत नाही. त्यामुळे ‘मला कसलाच अहं नको होऊ दे’, अशी माझ्याकडून त्यांना सतत प्रार्थना होते. ‘मला कसले ज्ञान नको, कला नको, कसली प्रसिद्धीही नको. मला केवळ भक्ती द्या आणि मला सतत नामजप करता येऊ दे’, अशी प्रार्थना मी करते. तेव्हा ‘प्रत्येक क्षणी तेेच मला आधार देतात. मला त्यांच्या आधाराविना जगताच येणार नाही’, असे वाटते.
४ ई. पूर्वी इतरांचा पुष्कळ राग येणे आणि आता तो न्यून होणे : पूर्वी मला इतरांचा पुष्कळ राग यायचा. त्यामुळे ‘चिडून बोलणे, रागावणे, अबोल रहाणे, प्रतिक्रियात्मक बोलणे’ असे माझे सगळे दोष उफाळून यायचे. नंतर ‘मी इतकी का चिडत आहे ?’, या विचाराने मलाच वाईट वाटायचे. अनेकदा मला उगाच आईचा राग यायचा किंवा माझ्या आयुष्यात यापूर्वी आलेली माणसे आठवून त्यांचा पुष्कळ राग यायचा. आता मला तसा राग येत नाही.
४ उ. प्रेमभाव वाढणे
४ उ १. पूर्वी आश्रमातील साधकांविषयी काही न वाटणे आणि आता साधक आपल्याच परिवारातील सदस्य असल्याचे वाटून त्यांच्याविषयी प्रेम वाटणे : मला पूर्वी आश्रमातील साधकांविषयी काही वाटायचे नाही. आता ‘सगळेजण माझा परिवार आहे’, असे वाटते. आमचे फारसे कुणी नातेवाईक नाहीत; त्यामुळे आता मला साधक माझ्या परिवारातील सदस्य वाटतात. मला त्यांच्याविषयी प्रेम वाटते. कुणी कसेही वागले, तरी मला आता विसरता येते, वाईट वाटत नाही. कोणी चांगले वागले, तर त्यांच्यात अडकायला होत नाही. ‘आता स्वतःमध्ये पालट व्हायला हवा’, असे वाटते. पूर्वी मला असे वाटत नव्हते. ‘मला एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे’, असा विचार येतो. अजून पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत. आता माझा ‘इतरांचा विचार करणे, इतरांविषयी प्रेम वाटणे आणि सर्वजण माझ्या परिवारातील आहेत’, असे विचार थोडे वाढले आहेत.
४ उ २. निसर्गाकडे पाहून प्रेम वाटणे आणि नामजप आपोआप चालू होणे : मला आता पक्षी, प्राणी, झाडे, पाने, फुले यांच्याविषयी प्रेम वाटते. झाडांवरील पाने वार्याने हलतांनाचे दृश्य पाहिले की, माझा नामजप चालू होतो. मन निर्विचार होते आणि त्याच स्थितीत रहावेसे वाटते. ‘काही करावेसे वाटत नाही. शांतता अनुभवत राहूया’, असे वाटते. ‘पाने आनंदी असून तीसुद्धा नामजप करत आहेत’, असा विचार येतो. ‘कोणतेही फूल पाहिल्यावर ते फूल शिवाचे आहे किंवा कैलासावरचे आहे’, असे वाटते. मग मला ती फुले आणि पाने यांच्याशी बोलावेसे वाटते. त्यांना ‘नामजप करा’, असे सांगावेसे वाटते. मला निसर्गाविषयी पुष्कळ प्रेम वाटू लागले आहे. ‘कैलासावरचे दगडही किती सुंदर असतील ! ते दगडही नामजप करत असतील’, असेही मला वाटते.
४ उ ३. प्राण्यांविषयीही आता पुष्कळ प्रेम वाटून त्यांच्याशी बोलावेसे वाटणे : मला आता प्राण्यांविषयीसुद्धा पुष्कळ प्रेम वाटते. त्यांची काळजी घ्यावीशी वाटते. ‘आमच्या घराखाली एक कुत्रा आहे. ‘त्याला मी ‘तू ॐ नमः शिवाय ।’ म्हणतोस ना ? नामजप करतोस ना ?’, असे विचारले की, तो शांत होतो’, असे मला वाटते. त्याला बोललेले सर्व कळते, तसेच घरी बुलबुल पक्षी येतात. मला त्यांच्याशीसुद्धा बोलावेसे वाटते. मला त्यांना कवटाळावेसे वाटते. आता मला गायी-वासरे यांच्याबद्दल पुष्कळ प्रेम वाटते. ‘तेही माझ्या परिवारातीलच आहेत’, असे मला वाटते. मला या आधी प्राण्यांविषयी इतके प्रेम कधी वाटले नाही. हेही नामजपामुळे झाले असेल.
५. सेवा करतांना झालेले पालट
५ अ. कलेची सेवा करायची संधी भगवान शिवाने दिली असल्याचे जाणवून सर्व सेवा शिवच करवून घेत असल्याचे जाणवणे : मी संत आणि साधक यांच्या छायाचित्रांचा संग्रह (फोटोंचा ‘अल्बम’) सिद्ध करण्याची सेवा करते. ‘ती सेवाही शिव माझ्याकडून करवून घेतात’, असे मला वाटते; कारण माझी इतकी बुद्धी नाही की, मी सगळे समन्वय आणि सर्व सेवा करू शकेन; पण ‘त्या त्या वेळेला शिव मला सेवेतील काही विचार सुचवतात’, असा माझा भाव आहे. त्यामुळे मला पुष्कळ साहाय्य होते. संत हे शिवाच्या जवळचे असून त्यांच्यासाठी मला छायाचित्रे करण्याची संधी भगवान शिवांनी दिली आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संतांना गुरुदेवांच्या भेटीची सतत आठवण रहाणार आहे.
५ आ. उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून शिवच साहाय्य करत असल्याचे जाणवणे : छायाचित्रांच्या संग्रहाची सेवा तेच करवून घेतात. ती त्यांचीच कृपा आहे. मला त्यातील काही येत नाही. मी असमर्थ आहे. छायाचित्रांच्या संग्रहाची सेवा करतांना माझ्याकडून अनेकदा चुका होतात. उत्तरदायी साधिका मला त्या चुका आणि सेवेतील बारकावे दाखवून देऊन मला सेवा परिपूर्ण करण्यासाठी साहाय्य करते. तेव्हा शिवच तिच्या माध्यमातून मला साहाय्य करत असल्याचे जाणवून कृतज्ञता वाटते.
५ इ. आश्रमसेवा करतांना ‘आश्रम हा कैलास असून सगळे साधक कैलासावरचे निवासी आहेत’, असे वाटून प्रेमाने सेवा होणे आणि आश्रमात सगळ्या सुविधा उपलब्ध करून स्वतः शिव मात्र एका शिळेवर बसून ध्यान लावून साधे आयुष्य जगत असल्याचे जाणवणे : आश्रमसेवा करतांना माझ्या मनात असा विचार येतो, ‘हा आश्रम कैलास आहे.
तिकडेच मी सर्व सेवा करते आहे. साधकांसाठी अल्पाहाराची (चहा बनवण्याची) सेवा करतांना ‘सगळे साधक कैलासावरचे निवासी आहेत आणि मला त्यांच्यासाठी चहा करायची संधी दिली आहे. तो चहा प्यायल्यानंतर सगळ्यांचा नामजप होणार आहे आणि त्यांचे त्रास दूर होणार आहेत’, असा विचार माझ्या मनात येतो. ‘भोजनकक्ष आवरण्याची सेवा’ करतांना माझ्या मनात विचार येतात, ‘मी कैलासावर आवरण्याची सेवा करत आहे. तिकडचे हस्तप्रक्षालनपात्र (सिंक) स्वच्छ करत आहे. ते सगळे साहित्य शिवाचे आहे आणि मला ते सांभाळून वापरायचे आहे; कारण शिवाचे त्याच्या भक्तांवर एवढे प्रेम आहे की, शिवाने ते सगळे साहित्य भक्तांच्या प्रेमापोटी त्यांना दिले आहे. आम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून ते स्वतः मात्र एका शिळेवर बसून ध्यान लावतात. स्वतः साधे आयुष्य जगतात.
५ ई. ‘सर्व काही शिवाचे आहे’, असे वाटून आश्रमसेवा आणि घरातील कामे यांत भेद न जाणवणे : मला नामजप, भावप्रयोग, कलेची सेवा, आश्रम सेवा आणि घरातील कामे यांत आता भेद वाटत नाही. ‘सगळे शिवाचे आहे’, असे मला वाटते. ‘हे सर्व कैलासावर घडत आहे’, असे वाटते. प्रत्येक क्षणी मनात केवळ ‘ॐ नमः शिवाय ।’ हेच असते. छायाचित्रांची सेवा किंवा आश्रमसेवा असू दे, घरातील कामे असोत किंवा अधिकोषातील कामे असू देत, या सर्वांतून मला एकाच (समान) प्रकारचा आनंद मिळतो. सगळे सारखे वाटते. त्यामुळे मन बर्याच वेळा आनंदी असते आणि ‘प्रयत्न न करताही माझ्या तोंडवळ्यावर हास्य असते’, असे मला आतून जाणवते.
६. ‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे
‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनात हळूहळू शांतता यायला लागली आहे. ‘माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी डोके उघडे आहे’, असे जाणवते. कधी कधी तर अशी अनुभूती येते की, ‘सभोवताली काहीच नाही. हे जगही नाही. मी नाही. देव नाही. काहीच नाही. सगळे रिकामे आहे. केवळ एक पोकळी असल्याचे जाणवते. तेव्हाही मला चांगले वाटते. मीसुद्धा त्या पोकळीप्रमाणेच रिकामी आहे आणि मी जे काही करत आहे, ते शिवच करत आहे. हा देहही त्यांचाच आहे. विचारही त्यांचेच आहेत. नामजपही तेच करत आहेत या सर्वांत मी कुठेच नाही, असे जाणवते.
७. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टर, हे लिहून झाल्यावरसुद्धा मला असे वाटत नाही की, ‘मी हे लिहिले आहे. किंबहुना ‘मी काय लिहिले आहे ?’, तेही मला आठवत नाही.’ हे लिहितांना मला अनुभूती येत आहे की, ‘माझे येथे अस्तित्वच नाही.’ ‘देवाचे कौतुक करण्यास माझे आयुष्यही कमी पडेल’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर, हे सर्व मला सुचणे शक्य नाही. हे सर्व तुमच्या कृपेमुळे शक्य आहे. वर्ष २०१५ मध्ये आम्ही येथे आलो नसतो, तर हे सर्व घडले नसते. तुमच्या इच्छेनेच हे सर्व घडत आहे. हे सर्व लिखाण मी तुमच्या चरणी अर्पण करते. तुम्हीच माझे भोलेनाथ आहात. मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
‘ॐ नमः शिवाय ।’
– कु. स्मितल भुजले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |