पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात शिवशक्ती यागास प्रारंभ

पिंगुळी – प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्चला प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात या यागाला प्रारंभ झाला.

१० मार्चला म्हणजे यागाच्या पहिल्या दिवशी पहाटे काकड आरती, सकाळी ७ वाजता प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधीचे पूजन आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रामपुरोहित श्री. दुर्गाप्रसाद दांडेकर, याज्ञिक महादेव गाडगीळ आणि १२ ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत अन् भक्तीमय वातावरणात ‘शिवशक्ती यागा’ला प्रारंभ झाला. विष्णुसहस्रनाम जप, १ सहस्र १०८ वेळा कुंकूमार्चन, १२१ कमळपुष्प पूजा, आरती, मंत्रपुष्प, दुपारी १२ वाजता श्रींची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सांजआरती आणि पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. ११ मार्च हा यागाचा दुसरा दिवस आहे, तर १२ मार्चला यागाची सांगता होणार आहे. १३ मार्चला प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे ५० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझर, थर्मल चेकिंग आणि अन्य सर्व नियम पाळून मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी भाविकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.