एका भक्ताने विचारले, ‘महाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), ‘आपणासारखे करती तात्काळ ।’, असे जगद़्गुरु श्रीतुकोबा म्हणतात. आम्ही आपल्या येथे २०-२० वर्षे असूनही आहोत तसेच आहोत.’ यावर श्रीमहाराज किंचित् हसले आणि म्हणाले, ‘तात्काळ याचा अर्थ ‘ती वेळ आल्यावर.’ नामाचे साधन करता करता चित्त शुद्ध होत जाते आणि साधक नामात रंगून देहाला विसरायला लागतो. त्या वेळी त्याच्यावर संपूर्ण कृपा करण्यास सद़्गुरु एका क्षणाचाही विलंब लावत नाहीत, असा त्या ओळीचा अर्थ आहे. असा क्षण कधी येईल, याविषयी सद़्गुरु सतत वाट बघतच असतात.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)