संतांविषयी एकदा बोलणे चालू असता श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘‘या तिन्ही योनी श्रेष्ठच खर्या; पण बारकावाच पहायचा, तर थोडासा भेद आढळतो. विश्वामित्र हे स्वतः धनुर्विद्येत प्रवीण असूनही यज्ञात विघ्ने आणणार्या राक्षसांचा प्रतिकार त्यांनी स्वतः केला नाही; ना शस्त्राने, ना तपोबलाने; उलट राम-लक्ष्मणांना मागून आणून त्यांना धनुर्विद्येत प्रवीण करून त्यांच्याकरवी राक्षसांचा संहार केला. राम-लक्ष्मण हे देवाचे अवतार आणि जन्माने क्षत्रिय. तेव्हा दुराचार्यांचा विनाश करणे, हे त्यांचे कर्तव्यच होते. ते निःस्वार्थ बुद्धीने केल्यामुळे त्यांना बंधनास कारण झाले नाही. आता संतांकडे पाहिले, तर काय आढळते ? कुणाचाही नाश व्हावा, हा विचारही संतांच्या बुद्धीला शिवत नाही. श्रीज्ञानेश्वर महाराज यांनी देवापाशी काय मागितले ? तर ‘खळांची व्यंकटी’, म्हणजे वाकडेपणा किंवा दुर्बुद्धी नष्ट होवो हेच ना ? आपल्याला त्रास देणार्याचा सुद्धा कुणी संतांनी नाश इच्छिल्याचे उदाहरण नाही. तेव्हा संतांची भूतमात्राविषयी केवळ निर्मळ प्रेमाचीच दृष्टी असते, हे दिसून येते.’’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)