सासवड (जिल्हा सातारा) येथील पेट्रोल चोरी केली पोलिसांनी उघड

शेतातील मातीतून केली होतील पाईपलाईन

सातारा, ४ मार्च (वार्ता.) – मुंबईहून पुणे मार्गे सोलापूर अशी उच्चदाब इंधन वाहिनी भूमीखालून फलटण तालुक्यातील सासवड गावाच्या सीमेतून गेली आहे. ही हिंदुस्थान पेट्रोलियम आस्थापनेची पेट्रोल वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने फलटण तालुक्यातील सासवड परिसरातील विहिरींमध्ये पेट्रोल मिसळले गेले होते; मात्र पेट्रोलचा निचरा कुठून होत आहे, हे स्पष्ट होत नव्हते. लोणंद पोलिसांनी मोठ्या चतुराईने ही पेट्रोल चोरी उघडकीस आणली आहे.

याविषयी फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे म्हणाले की, पेट्रोल पाईपलाईन १४ इंचाची होती. ही पाईप लाईन खोदून त्याला छिद्र (टॅब) पाडण्यात आले होते. त्याला एक छोटी पाईप जोडून पेट्रोल चोरी करण्यात येत होती. अनुमाने २ सहस्र लिटर पेट्रोल चोरी झाल्याची तक्रार आस्थापनाने दिली आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान (इंडियन पिनल कोड) कलम ३७९ आणि ५११ अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास प्रगती पथावर असून प्राथमिकदृष्ट्या आस्थापनाशी संबंधित लोकांची चौकशी चालू आहे. लवकरच आरोपींना कह्यात घेतले जाईल.

पाईपलाईनमधून पेट्रोल आणि डिझेलची गळती होऊन ते परिसरातील शेतामध्ये पसरले, तसेच परिसरातील विहिरींमध्येही मिसळले. त्यामुळे पाण्यातील मासे, बेडून, साप मृत्यूमुखी पडले आणि परिसरातील पाणी दूषित होऊन १ किलोमीटरपर्यंत दुर्गंधी पसरली. विहिरींतून पाणीमिश्रीत पेट्रोल आणि डिझेल भरण्याची प्रक्रिया चालू केली.