१. सनातनचे सात्त्विक श्री दुर्गादेवीचे चित्र पाहून एका जिज्ञासूने ‘या चित्राने ग्रंथप्रदर्शनाकडे खेचून आणले आहे’, असे सांगणे
‘मार्च २०१९ मध्ये पाचोरा, जिल्हा जळगाव येथे धर्मरथावरील ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन होते. तेव्हा तिथे एक जिज्ञासू आले आणि ते ग्रंथ पहातांना मांडलेल्या देवतांच्या चित्राकडे एकटक पहात उभे होते; म्हणून एका साधिकेने त्यांना ‘आध्यात्मिकदृष्ट्या ही चित्रे कशी आहेत ?’, याची माहिती सांगितली. तेव्हा तो जिज्ञासू पटकन म्हणाला, ‘‘माझ्या डोळ्यांसमोर ज्या देवीचे रूप सतत दिसत असते, ते हे दुर्गादेवीचे चित्र आहे आणि ‘या चित्राने मला येथे ओढत आणले आहे’, असे वाटते.’’ नंतर त्यांनी प्रश्न विचारला, ‘‘देवीचे चित्र काढतांना तिने प्रत्यक्ष दर्शन दिले, तेव्हा देवीने स्वतःचे चरण वर उचलले. त्या वेळी ‘तिच्या चरणांशी साधिकेला काही दिसले का ?’, असे चित्र काढणार्यांना विचारून सांगा.’’ तेव्हा एक साधिका म्हणाली, ‘‘देवीचे चित्र काढतांना तिने प्रथम तिचा एक एक अवयव दाखवला होता आणि नंतर तिचे प्रकट रूप दाखवले होते.’’ तेव्हा त्यांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला आणि पुराणातील एक कथा सांगत ते म्हणाले, ‘‘एकदा ऋषि देवीची स्तुती करायला बसले होते. तेव्हा देवीने त्यांना याच रूपात दर्शन दिले होते आणि देवीने स्वतःचा एक चरण वर उचलल्यावर त्यांना त्या चरणांखाली एक कमळ उमटलेले दिसले अन् त्या कमळाच्या प्रत्येक पाकळीवर स्तोत्रे लिहिलेली होती. नंतर त्या स्तोत्रातून अनेक स्तोत्रे आणि अष्टके यांची निर्मिती झाली होती; म्हणून ‘या कलियुगात हे चित्र काढणार्या असाधारण आहेत’, असे मला वाटते, तरी माझ्या मनातील हा प्रश्न त्यांना विचारून मला सांगा.’’
२. सनातनच्या सात्त्विक अत्तरामुळे समाजातील लोकांना आलेली अनुभूती
जून २०१९ मध्ये फलटण येथे धर्मरथ प्रदर्शनाचे नियोजन केले होते. तेव्हा प्रदर्शन पहायला एक हितचिंतक बाई आल्या होत्या. त्या ग्रंथ प्रदर्शन पाहून प्रभावित झाल्या. त्यांच्या समवेत आलेल्या कामवालीबाईला त्या म्हणाल्या, ‘‘सनातनचे अत्तर लावून कामाला गेल्यावर अडकलेली कामे किंवा अडथळे दूर होतात.’’ ही माहिती सांगितल्यावर ती कामवाली बाई हसली; म्हणून मी त्यांना धर्मरथावर अनुभवलेला आणखी एक प्रसंग सांगितला. ‘आमचा धर्मरथ जालना येथील हनुमान मंदिराजवळ लावला होता. तेव्हा तेथील एक वडापाववाला प्रदर्शन पहायला आला होता. त्यांना सनातनच्या पूजासाहित्याचे महत्त्व सांगतांना त्यातील अत्तराची माहिती असलेले पान वाचून दाखवले आणि नंतर आमची हनुमंताला चमेली अत्तर लावण्याच्या संदर्भात चर्चा झाली. ५ मासांनी त्याच मंदिरात तो आम्हाला भेटला. तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुमचे चमेली अत्तर बजरंगबलीला अर्पण केल्यावर काही दिवसांतच माझी पैशांची अडचण सुटली.’’ त्यानंतर तो आणखी चमेली अत्तर घेऊन गेला.’
त्या बाईने हा अनुभव ऐकला आणि लगेच चमेली अत्तर घेतले. तिने अत्तराचे पैसे दिले आणि तिला भ्रमणभाष आला, ‘बाई, उद्यापासून तुमची दागिन्यांच्या दुकानातील नोकरी पक्की झाली आहे. आज तुम्ही काम समजावून घेण्यासाठी या.’ भ्रमणभाषवरील बोलणे ऐकल्यावर तिने माझे पाय धरले आणि मला म्हणाली, ‘‘दादा, तुम्हाला माझे त्रास कसे सांगू ? घरात मुलाच्या पाठोपाठ पती वारले आणि त्यांचे दिवस झाले अन् लगेच दीर वारले. त्यामुळे माझ्याकडे काहीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. मी काम मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, तरी मला काम मिळत नव्हते. या बाईंनी माझी परिस्थिती जाणून मला कामाला ठेवले आहे. आज तुम्ही मला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलात. मी अत्तराचे पैसे दिले अन् देवाने मला अत्तर वापरण्याआधीच चमत्कार दाखवला. मी तुमची आभारी आहे.’’ असे म्हणत ती बाई निघून गेली. तेव्हा धर्मरथावर असणारे सर्व जिज्ञासू प्रभावित झाले आणि सर्वांनी अत्तर विकत घेतले.
३. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनावर समाजातील एका वेडसर व्यक्तीने ‘हे सर्व श्रीकृष्णाचे आहे’, असे सांगून देवाच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करणे
‘११.१०.२०१९ या दिवशी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवर असणार्या खेतीया या गावात धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन होते. त्या खेड्यातील एक वेडा तरुण धर्मरथाजवळ फिरत होता. तो मांडलेले प्रदर्शन पहातांना श्रीकृष्णाविषयी बोलत होता; परंतु तेथील काही तरुणांनी त्याला न्यून लेखले आणि ‘हा स्वतःला श्रीकृष्ण समजतो अन् बासरी वाजवत फिरत असतो’, असे चिडवण्याच्या उद्देशाने म्हटले. तो वेडा त्यांच्यावर रागावल्यावर ती मुले पळून गेली. तो शिवीगाळ करत होता; म्हणून मी त्याला रथाच्या समोरून पळवून लावले, तरी तो पुन्हा दुपारी आला आणि भगवान श्रीकृष्णाचा ग्रंथ मागत होता. तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘त्या ग्रंथाची किंमत १५ रुपये आहे.’’ नंतर त्याचे लक्ष जपमाळेकडे गेले आणि तो तिची किंमत विचारू लागला; म्हणून तेथील जिज्ञासूंनी त्याला जाण्यास सांगितले. तेव्हा तो त्या जिज्ञासूंना ‘यात ज्ञान आहे, ते घेऊन जा; कारण हे श्रीकृष्णाचे अमूल्य ज्ञान आहे, तरी त्याकडे लक्ष द्या’, असे बडबडत तिथून निघून गेला. सायंकाळी तो वेडा पुन्हा धर्मरथावर आला आणि ‘गावातील कुणी नाही’, असे पाहून त्याने दोन जपमाळा (त्याने जिज्ञासूंना सांगितलेले जपमाळेचे महत्त्व ऐकले होते.), २ लघुग्रंथ आणि २ पदके विकत घेतली. तेव्हा मला आश्चर्य वाटले, ‘याच्याकडे इतके पैसे कसे आले ?’ मी त्याला विचारले, ‘‘वाचता येते का ?’’ तेव्हा त्याने मान हलवून ‘येते’, असे सांगितले. नंतर त्याने सांगितले, ‘‘माझे शिक्षण १२ वीपर्यंत झाले असून माझे वडील शेतकरी होते. ते वारल्यावर मी, आई आणि माझा लहान भाऊ एकत्र रहात होतो. माझ्याकडून माझी महाविद्यालयाची आणि इतर कागदपत्रे हरवली; म्हणून आईने मला घराबाहेर काढले.’’ नंतर त्याने प्लास्टिकच्या पाईपला भोके पाडून आणि एका टोकाला ‘बल्बच्या होल्डर’चे झाकण लावून बनवलेली बासरी आम्हाला दाखवली. त्याने ती बासरी कपड्यांच्या गोंड्याने सजवली होती. ती त्याने वाजवून दाखवली. तेव्हा मला त्याचे आश्चर्य आणि कौतुकही वाटले; म्हणून मी त्याला ‘नामजप आणि साधना कशी करायची ?’, ते सांगितले आणि त्याला म्हणालो, ‘‘तू इतका चांगला आहेस, तर इतके खराब कपडे का घालतोस ?’’ थोड्या वेळाने तो चांगले कपडे घालून आला.
तेव्हा सेवेत असणारे साधक समाजाला साधना सांगतात, ती या वेड्याने ऐकली आणि त्याला त्याचे महत्त्व समजले. तो समाजाला ‘हे सर्व श्रीकृष्णाचे आहे’, असे सांगून देवाच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी मला त्याच्या मनातील श्रीकृष्णाचे स्थान अनुभवता आले. त्याने त्याच्या परीने कृष्णाची बासरी सजवली होती; परंतु मला त्या बासरीकडे पाहून देवाची लीला अनुभवता आली. ‘तेव्हा देवाने हे प्रसंग शिकण्यासाठीच घडवले आहेत’, असे लक्षात आले.’
४. सनातनचे ग्रंथ वाचल्यामुळे एका जिज्ञासूच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन तो व्यसनमुक्त होणे आणि गुरुदेवांची अगाध लीला आम्हाला अनुभवण्यास मिळणे
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर असणार्या नवापूर येथे धर्मरथ ग्रंथप्रदर्शन लावले होते. या गावात प्रदर्शन लावून ७ मास झाले होते आणि पुन्हा प्रदर्शन लावणार असल्याचे जिज्ञासूंना कळवले होते. त्यातील एक जिज्ञासू पुन्हा प्रदर्शन पहाण्यासाठी आले होते. त्यांनी आधी ५ ग्रंथ घेतले होते, तरी त्यांनी सर्व प्रदर्शन पाहिले आणि मला आधीचे ग्रंथ वाचून आलेले अनुभव सांगतांना म्हणाले, ‘‘माझी पत्नी काही कारणाने मला सोडून गेली होती. त्यामुळे माझ्या मनाची नकारात्मकता वाढली होती. ‘मी घराबाहेर पडल्यावर किंवा गावातले लोक एकत्र बोलत असतील, चर्चा करत असतील, तर ते माझ्याविषयीच बोलत आहेत’, असे वाटून मला अपराध्यासारखे वाटायचे. माझ्यातील आत्मविश्वासच नष्ट झाला आणि मला दारूचे व्यसनही लागले. तेव्हा मला तुमचे हे वाहन दिसले आणि मी काही ग्रंथ घेतले. (त्यांनी स्वभावदोष निर्मूलन या मालिकेतील ग्रंथ नेले होते.) ‘ते ग्रंथ वाचतांना शरीर आणि मन यांवर विचारांचा परिणाम होतो’, असे लक्षात आले. त्यातला काही भाग माझ्या लक्षात आला नाही; पण माझ्या मनात विचार वाढायचे, तेव्हा परिणामांची जाणीव व्हायची. त्यामुळे मी या विचारांतून बाहेर पडलो आणि माझी व्यसनातून सुटका झाली. या ग्रंथाच्या साहाय्याने मला बाहेर पडता आले; म्हणून मी तुमचा आभारी आहे.’’
त्यांनी या वेळी साधनेविषयीचे (आनंदी जीवनासाठी अध्यात्म, साधना, गुरुकृपायोग आणि भीती, अपयश, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार !) ग्रंथ घेतले. ते पाहून मला आश्चर्य वाटले; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘हेच ग्रंथ का निवडले ?’’ तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मनातील विचार सांगितले आणि म्हणाले, ‘‘यातून मला अजून काही शिकायला मिळेल.’’
‘गुरुदेव, प्रदर्शन बघायला येणार्या व्यक्तीला त्यांच्या स्थितीनुसार कोणते ग्रंथ घ्यायचे आणि त्यांच्या स्थितीत पालट झाल्यावर जिज्ञासूंना ‘साधनेला आवश्यक ग्रंथ कोणते ?’, याचे मार्गदर्शन तुम्हीच सूक्ष्मातून करत असता. गुरुदेव, सूक्ष्मातून तुम्ही आमच्या समवेत असता. समाजातील एखादा जीव साधना करणारा असतो, अशा व्यक्तींना मार्गदर्शन पाहिजे असते, ते तुम्हीच लक्षात आणून देत असता आणि तरीही नामानिराळे राहून तो आनंद आमच्या सारख्या जिवांना देऊन तुमची कृपा अनुभवायला देता, यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’
५. वर्ष २०१९ ऑक्टोबरमध्ये धुळे येथे धर्मरथ प्रदर्शनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
५ अ. देवीची ओटी भरून तिला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर धर्मरथ प्रदर्शनाला जागा मिळणे : ऑक्टोबर २०१९ मध्ये नवरात्रीला धुळे येथील एकविरादेवीच्या मंदिराजवळ धर्मरथ लावण्याचे नियोजन होते; पण मंदिराच्या परिसरात इतर दुकानदार आणि खेळणी विक्रेते यांनी पुष्कळ गर्दी केली होती. त्यामुळे धर्मरथ लावायला अनुकूल जागा मिळत नव्हती. धर्मरथ प्रदर्शनाला जागा मिळावी; म्हणून आध्यात्मिक उपाय करून आम्ही देवीची ओटी भरायला गेलो. आम्ही पुजार्याला देवीच्या चरणांजवळ नारळ ठेवण्यास सांगितला आणि देवीला शरण जाऊन डोळे बंद करून प्रार्थना करतांना हाताला स्पर्श झाला; म्हणून मी डोळे उघडले, तर पुजार्याने हातात प्रसाद ठेवला होता. तेव्हा माझे लक्ष देवीकडे गेले. तेव्हा देवी ‘तुझे सर्व मागणे पूर्ण होईल. तू पुढची सिद्धता कर’, असे म्हणत असल्याचे जाणवले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त झाली. आम्ही देवीच्या आज्ञेप्रमाणे पुढच्या सिद्धतेला लागलो. आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि श्री. पंकज बागूल यांचे लक्ष एका जागेकडे गेले अन् ‘ती जागा आपल्याला मिळेल’, असा त्यांना आत्मविश्वास वाटला. त्या जागेवर पोलिसांचे वाहन आणि तंबू होता. त्यामुळे तो पोलीस वरिष्ठांना भेटला. त्याने त्यांना कार्याची माहिती सांगितली आणि त्या जागेच्या संदर्भात ‘ना हरकत’ अनुमती मिळवून तिथे धर्मरथ प्रदर्शन लावले. हे सर्व देवानेच करवून घेतले होते. आम्ही आमच्या बुद्धीने विचार केला असता, तर ती जागा मिळाली नसती.
५ आ. देवाने आमच्या संरक्षणासाठी भिकार्याच्या माध्यमातून येऊन टोपी घालण्याचे महत्त्व सांगणे : मी नवरात्रीच्या प्रदर्शन सेवेत होतो. तेव्हा त्या जत्रेत एक भिकारी आला आणि भगवान श्रीकृष्णाचा लघुग्रंथ मागू लागला. तेव्हा साधकांनी त्याला ‘विनामूल्य ग्रंथ मिळत नाही’, असे सांगितले, तरी तो ग्रंथ मागत तिथेच उभा होता. एका बाजूने जिज्ञासूंची प्रदर्शन पाहण्यास गर्दी होत होती आणि हा भिकारी ग्रंथ मागतच होता; म्हणून मी त्याला म्हटले ‘‘बाबा, आता जा ना.’’ तेव्हा त्याने मला विचारले, ‘‘श्रीकृष्णाचा गुरु कोण ?’’ मी गोंधळून गेलो; म्हणून त्याने तोच प्रश्न पुन्हा विचारला. तो जोरात म्हणाला, ‘‘अरे, देवाचे ग्रंथ विकता, तर उत्तर सांगा ना !’’ तेव्हा मी म्हणालो ‘‘अहो, जगद्गुरूंचा गुरु कोणी असेल का ?’’ तेव्हा तो हसायला लागला; म्हणून दुसर्या एका सहसाधकाने पटकन उत्तर दिले, ‘‘सांदिपनिऋषि.’’ तेव्हा त्या भिकार्याने त्या साधकाचे कौतुक केले आणि म्हणाला ‘‘त्याने घातलेल्या पिवळ्या टोपीमुळे त्याला सुचले. तुम्हीही तशी टोपी घाला.’’ नंतर तो भिकारी दिसेनासा झाला. तेव्हा ‘देवाने आम्हाला अंतर्मुख करण्यासाठी हा प्रसंग घडवला आहे’, असे वाटले. काही वेळाने विचार करत असतांना असे लक्षात आले की, तो भिकारी नव्हता, तर साक्षात् ‘प.पू. भक्तराज महाराज (बाबा)’ आले होते. नंतर आम्ही टोपी घातली.’
– धर्मरथसेवक,
श्री. सागर म्हात्रे, फलटण, सातारा. (ऑक्टोबर २०१९)
|