१. नेहमीच्या उत्पादनाच्या सेवेसमवेत प्रतिदिन १ ते २ घंटे भाषांतराची सेवा करणे
‘श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) हे देवद आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. ते तेथील उत्पादनांच्या बांधणीची सेवा करतात. ते गुजराती भाषेचे जाणकार असल्याने पू. संदीप आळशी यांनी आम्हाला गुजराती भाषांतराच्या सेवेसाठी त्यांचे साहाय्य घेण्यास सुचवले. मागील दोन मासांपासून (महिन्यांपासून) आम्ही त्यांना भाषांतराची सेवा पाठवण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून प्रतिदिन ते उत्पादनाच्या बांधणी सेवेसह १ ते २ घंटे भाषांतराची सेवा करतात.
२. सेवेत सांगितलेल्या सुधारणा सकारात्मकतेने स्वीकारणे
श्री. जामदारकाका यांचे गुजराती भाषेवर चांगले प्रभुत्व आहे; परंतु संस्थेच्या लेखनशैलीनुसार त्यात काही सुधारणा करणे आवश्यक असते. त्यांनी प्रथम भाषांतर केलेल्या लिखाणात सुधारणा करून ते त्यांना पाठवण्यास मला थोडा संकोच वाटत होता; कारण ‘अनेकदा वयोमानानुसार आणि मागील सेवेचा अनुभव असल्याने वयस्कर साधकांना त्यांच्या सेवेतील काही पालट किंवा सुधारणा स्वीकारणे कठीण जाते’, असे मला वाटले; परंतु या गोष्टीला श्री. जामदारकाका अपवाद ठरले आणि त्यांनी त्या सर्व सुधारणा सकारात्मकरित्या स्वीकारल्या.
३. भाषांतराची सेवा अधिक परिपूर्ण आणि गुरूंना अपेक्षित करण्यासाठी अभ्यास करणे
काकांनी ‘अयोग्य शब्द किंवा अयोग्य वाक्यरचना यांऐवजी कोणते शब्द वापरणे किंवा कोणती वाक्यरचना करणे अधिक योग्य आहे ?’ यासंदर्भातील संपूर्ण सूची मागवली. यातून त्यांची भाषांतराची सेवा आणखी परिपूर्ण आणि गुरूंना अपेक्षित करण्यासाठीचा त्यांचा उत्साह दिसून आला. ते त्यांना पाठवलेल्या शब्दांचा अभ्यासही करतात. यावरून त्यांची शिकण्याची वृतीही जाणवली.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या सेवेविषयी कृतज्ञताभाव असणे
प्रत्येक वेळी सेवेबद्दल, ‘ही सेवा परात्पर गुरु डॉक्टरांनीच पाठवली आहे आणि ती अजून चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’ असा सेवेविषयीचा त्यांचा कृतज्ञताभावही जाणवला. त्यांनी लिहिलेल्या पुढील पत्राच्या माध्यमातून या वयात त्यांची ‘नवीन सेवा स्वीकारण्याची आणि ती चांगली करण्याची’ तळमळ देवाने लक्षात आणून दिली, त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
काकांनी पाठवलेल्या मूळ गुजराती भाषेतील पत्राचे मराठीत भाषांतर करून खाली दिले आहे.’
– सौ. देवी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्री. कृष्णकुमार जामदार यांचे पत्रसप्रेम नमस्कार,आपल्या मागील पत्राने (मागील पत्रात गुजराती भाषांतराची सेवा करणार्या साधिका श्रीमती सुचेता जठार यांनी त्यांना परकीय आणि योग्य-अयोग्य शब्दांच्या सुधारणा पाठवल्या होत्या.) माझा आत्मविश्वास वाढला आणि माझ्या उत्साहातदेखील वाढ झाली आहे. खरेतर, मी बर्याच वर्षांनंतर ही सेवा करत असल्याने ‘ती स्वीकारार्ह असेल का ?’, या विचाराने मी जरा अस्वस्थ झालो होतो; परंतु तुमच्या पत्राने मला प्रोत्साहन मिळाले. माझा आत्मविश्वास दुप्पट झाला. प्रत्यक्षात हे सर्व करणारी परात्पर गुरुमाऊलीच आहे. मी तर एक माध्यमच आहे. अन्य काही लिखाण करतांना (दैनंदिनी लिहिणे, स्वभावदोष सारणी) माझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोटांमधे पुष्कळ वेदना होतात; परंतु गुजराती भाषांतरची ही सेवा करतांना मला त्याची जाणीवसुद्धा होत नव्हती. ही गोष्ट सेवा केल्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आली. हीसुद्धा परात्पर गुरुदेवांचीच कृपा आहे. सतत २ ते ४ घंटे लिखाणाची सेवा करतांना माझे या समस्येकडे लक्षच जात नाही, तसेच सेवा सोडून उठायलाही मन होत नाही. (मूळ गुजराती पत्रात त्यांनी आरंभी ‘समस्येकडे’ या शब्दात ‘कडे’ या शब्दासाठी ‘तरफ’ शब्द लिहिला होता; पण हा परकीय शब्द असल्याचे आम्ही त्यांना यापूर्वीच्या अभ्यास धारिकेत तो सुधारणा करून पाठवला होता. ते ध्यानात ठेवून त्यांनी तो खोडून ‘भणी’ हा योग्य (गुजराती) शब्द लिहिला. यावरून सांगितलेल्या चुका स्वीकारून त्यात लगेच पालट करण्याचा त्यांचा चांगला भाग लक्षात आला. – सौ. देवी कपाडिया) मी तुम्ही पाठवलेल्या शब्दांच्या सूचीचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास आनंद देणारा आहे. ‘असेच मला नेहमी शिकण्याच्या स्थितीत ठेवून मला अधिकाधिक सेवेची संधी मिळावी’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या पत्राचे उत्तर पाठवण्यास विलंब झाला, यासाठी क्षमायाचना करतो.’ – आपला नम्र, श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.९.२०२०) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |